Danger to global climate change; Vasundhara Bachao Yatra from Yavatmal | जागतिक हवामान बदलामुळे धोक्याची घंटा; यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ यात्रा
जागतिक हवामान बदलामुळे धोक्याची घंटा; यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ यात्रा

ठळक मुद्दे१५ हजार शास्त्रज्ञांचा इशारा :

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : हवामान बदलामुळे मानव जातीलाच धोका निर्माण झाला आहे. जगातील १८४ देशांमधील १५ हजार शास्त्रज्ञांनी याबाबत इशारा देऊन पृथ्वीच्या रक्षणाची आर्त हाक दिली. त्यासाठी यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ ही प्रबोधन संवाद यात्रा सुरू करीत असल्याचे अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
शेतकरी आत्महत्या आणि आता कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बळी जात असल्याने संपूर्ण जगाचेच लक्ष यवतमाळवर केंद्रित झाल्याचे सांगून राज्य दुष्काळ निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा म्हणाले, दुष्काळ, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ, वणवे ही मानवनिर्मित संकटे आहेत. याचे मूळ कारण जीवाष्म इंधन (फॉसिल फ्युएल) आहे. यावर आधारित कोळसा, पेट्रोल, डिझेल, गॅस ही ऊर्जा स्त्रोते आहेत. यामुळे जैवविविधतेचा लोप होत आहे. परिणामी मानवाचे भरणपोषण आणि आरोग्याला धोका निर्माण झाला. यावर वेळीच उपाय न शोधल्यास पृथ्वीसह मानवाचा सर्वनाश होण्याचा धोका आहे, असे प्रा. देसरडा म्हणाले.
सध्या देशातील शेती संकटात असून रासायनिक आणि औद्योगिक शेती हे त्याचे मूळ कारण आहे. शेतकरी परावलंबी झाला आहे. केवळ कंपन्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देणारी व्यवस्था निर्माण झाली आहे. यातून वसुंधरेच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण झाले असून त्याचा पहिला फटका शेतकरी आणि मानवी जीवनाला बसणार आहे. जगातील १८४ देशांमधील तब्बल १५ हजार ३६१ शास्त्रज्ञांनी हवामान बदल ही मानवी समाजासमोरील अव्वल समस्या असल्याचा इशारा दिला आहे. कर्ब आणि अन्य विषारी वायूंच्या बेसुमार उत्सजर्नामुळे तापमान वाढीचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला. त्यामुळे वसुंधरा व मानव जातीला वाचविण्यासाठी समतामूलक शाश्वत मार्ग स्वीकारण्याचे आवाहन देसरडा यांनी केले.


राज्यकर्त्यांची फोडा आणि झोडा नीती
धनदांडग्यांच्या मस्तवाल आणि चंगळवादी जीवनशैलीला तत्काळ थांबविण्याची गरज प्रा. देसरडा यांनी व्यक्त केली. बुद्ध, फुले, गांधी, आंबेडकर यांच्या सम्यक विचारानेच विषमता, विसंवाद, विध्वंस आदी संकटांचा मुकाबला शक्य आहे.मात्र, दुर्र्दैवाने या महापुरुषांना एकमेकांविरूद्ध उभे करून जनतेत फूट पाडली जाते व त्यातून राज्यकर्त्यांचे फावते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आजी आणि माजी सर्वच राज्यकर्ते तोडा-फोडा नितीचा अवलंब करीत आले असून आताही सत्ताधारी तेच तंत्र अवलंबत असल्याचे ते म्हणाले.


Web Title: Danger to global climate change; Vasundhara Bachao Yatra from Yavatmal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.