सीओंच्या धोरणावर नगरसेवकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:36 PM2018-04-20T23:36:25+5:302018-04-20T23:36:25+5:30

येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर हे सांगितलेल्या कामांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने काही नगरसेवकांमध्ये कमालिचा रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे बोरकर यांच्या बदलीसाठी नाराज नगरसेवकांचा एक गट एकवटला आहे.

Corporators' Displeasure on CO Policy | सीओंच्या धोरणावर नगरसेवकांची नाराजी

सीओंच्या धोरणावर नगरसेवकांची नाराजी

Next
ठळक मुद्देबदलीसाठी फिल्डींग : विकास कामांबाबत उदासीन असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर हे सांगितलेल्या कामांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने काही नगरसेवकांमध्ये कमालिचा रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे बोरकर यांच्या बदलीसाठी नाराज नगरसेवकांचा एक गट एकवटला आहे.
वणी नगरपरिषदेवर भाजपाचा एकछत्री अंमल आहे. विरोधकच नसल्याने कामांची गती वाढावी, असे या नाराज असलेल्या नगरसेवकांना वाटते. मात्र प्रभागातील समस्यांकडे मुख्याधिकारी संदीप बोरकर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. नगरसेवकांची ही धूसफूस गेल्या अनेक दिवसांपासून आहे. याबाबत काही नगरसेवकांनी वरिष्ठांकडे तक्रारीही केल्या. मात्र तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे या नाराज नगरसेवकांच्या गटाचे म्हणणे आहे. परिणामी नगरसेवकांच्या या गटात रोष व्यक्त केला जात आहे. वणी शहरात डुकरांचा मुक्त धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी यवतमाळ येथील कंत्राटदाराला ठेकाही देण्यात आला. परंतु वराह पालन करणाऱ्यांकडून डुकरांचा बंदोबस्त करण्यात व्यत्यय येत असला तरी हा व्यत्यय दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
वणी शहरातील साईबाबा मंदिर ते लोकमान्य टिळक महाविद्यालयापर्यंत पथदिवे लावण्यासाठी खांब उभे करण्यात आले आहे. खांब उभे करण्याचे काम एक वर्षापूर्वीच पूर्ण झाले. परंतु अद्यापही या खांबावर पथदिवे लावण्यात आले नाही. कोणतेही काम सांगितले की, मुख्याधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे आम्हाला नागरिकांचा रोष सहन करावा लागत असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
बदलीसाठी आमदारांना निवेदन
वणी येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर हे आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ नसून त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका रंजू निलेश झाडे यांनी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मुख्याधिकारी बोरकर यांची भूमिका विकासाच्या विरोधात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नगरपरिषदेमध्ये बांधकाम परवानगी ही गैरमार्गाने दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पालिकेत कोणत्याही स्वरूपात महसूल जमा होईल, याचीसुद्धा दखल घेतल्या जात नाही. सत्तेतील पक्षाच्याच नगरसेवकाची कामे होत नसल्याचे झाडे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बोरकर यांची त्वरित बदली करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका रंजू झाडे यांनी निवेदनातून केली आहे.

कोणतेही विकास काम करण्यासाठी एका प्रक्रीयेतून जावे लागते. अमूक एक काम करा, असे तोंडी सांगून होत नाही. मी कधीही कुणाला उडवाउडवीची उत्तरे दिली नाही. दिली असेल तर कधी आणि कोणत्या विषयात मी उडवाउडवीची उत्तरे दिली, याबाबत संबंधित नगरसेवकांनाच विचारणे उचित ठरेल.
-संदीप बोरकर,
मुख्याधिकारी न.प.वणी

Web Title: Corporators' Displeasure on CO Policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.