Closing of Kadkadit at Babulgaon, Darwha | बाभूळगाव, दारव्हा येथे कडकडीत बंद

ठळक मुद्दे चोख बंदोबस्त : टायर पेटवून वाहतूक रोखली

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव/दारव्हा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बाभूळगाव आणि दारव्हा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाभूळगाव येथे यवतमाळ-धामणगाव मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरण्यात आली. दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला होता.
बाभूळगाव परिसरातील नागरिक येथील बसस्थानकासमोरील यवतमाळ-धामणगाव मार्गावर सकाळी ११.३० वाजता ठाण मांडून बसले होते. यवतमाळ, धामणगाव, नेर, कळंब जाणारे सर्व मार्ग रोखून धरले. शहरातील सर्व दुकाने बंद होती. तहसीलदार दिलीप झाडे, पोलीस निरीक्षक अनिल पाटील, निवासी नायब तहसीलदार एम.बी. मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. पाटोळे घटनास्थळी दाखल झाले. सकाळी तालुक्यातील आरेगाव येथे एसटी महामंडळाची दारव्हा-पूलगाव बस रोखून धरली. तहसीलदार व ठाणेदार पोहोचल्यानंतर दीड तासानंतर ही बस रवाना झाली. बाभूळगाव येथे डेहणी मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखली. सर्वांच्यावतीने दिलीप वाघमारे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
दारव्हा येथे भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालय, एसटी बस बंद ठेवली होती. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी अंबिकानगरातील सम्राट अशोक बुद्धविहारात एकत्र आले. त्यानंतर मोर्चाने शहरातील व्यापाºयांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. दारव्हा आगाराच्या बसेस पूर्णत: बंद होत्या. शहरासह तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
आर्णी तालुक्यातील बोरगाव दाभडी येथे टायर जाळून आर्णी-तळणी मार्ग बंद करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लाल दिवा नसणे अडचणीचे
बाभूळगाव येथे रस्ता रोको दरम्यान तालुका दंडाधिकाºयाचे वाहन आंदोलनस्थळी पोहोचले. मात्र यावर लाल दिवा नसल्याने आंदोलकांनी प्रवासी वाहन समजून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर तालुका दंडाधिकाऱ्याचे वाहन असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलनकर्ते थांबले. लाल दिवा नसल्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळने कठीण होत आहे.