Closed in Pusad, Umarkhed subdivision | पुसद, उमरखेड उपविभागात बंद
पुसद, उमरखेड उपविभागात बंद

ठळक मुद्दे भीमा कोरेगाव घटनेचा निषेध : वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/उमरखेड/दिग्रस : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुसद आणि उमरखेड उपविभागात कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पुसद शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद होती. पुसद आगाराची बससेवाही ठप्प होती. शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. भीम टायगर सेना, भारिप बहुजन महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, समता सैनिक दल आदी विविध संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. शेकडो नागरिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आले. तेथून मोर्चाद्वारे एसडीओ कार्यालयावर पोहोचले. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडने उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले. शेंबाळपिंपरी बंद पाळून जय भीम मंडळातर्फे एसडीओंना निवेदन देण्यात आले.
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दिग्रसमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व बाजारपेठ बंद होती. आंबेडकरी जनसमूदाय आणि विविध संघटनांच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन दिले. मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय व दिग्रस आगाराची बससेवा बंद होती. शहरासह तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. महागाव तालुक्यातील मुडाणा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. फुले- शाहू- आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यात आला. फुलसावंगी येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. हिवरा संगम येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
उमरखेड शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात आला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. सामाजिक संघटनांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पोफाळी येथे निषेध मोर्चा काढून बंद पाळण्यात आला.
महागाव येथील विविध संघटनांच्यावतीने कडकडीत बंद पाळला. भीमा कोरेगाव घटनेतील मास्टर मार्इंड काढण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली.
पंचशील ध्वजांनी लक्ष वेधले
पुसद शहरात भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकºयांच्या हातातील पंचशील ध्वज सर्वांचे लक्ष वेधत होते. मोर्चेकºयांनी घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. मोर्चादरम्यान आणि शहरात बंद दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.


Web Title:  Closed in Pusad, Umarkhed subdivision
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.