जनावरांच्या ट्रकचे मध्य प्रदेशात दोन तर आंध्रात मिळतात १५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:16 AM2018-01-18T10:16:01+5:302018-01-18T10:22:11+5:30

७० जनावरांचा ट्रक मध्यप्रदेशात अवघ्या दोन लाखात मिळतो. परंतु याच ट्रकचे तेलंगणा-आंध्रप्रदेशात १५ ते १६ लाख रुपये मिळतात. ‘एमआयएम’च्या यवतमाळ शहर अध्यक्षाने बुधवारी पत्रपरिषदेत हा हिशेब मांडताना जनावर तस्करीच्या मार्गावरील पोलिसांचे लागेबांधेही उघड केले.

The cattle truck gets two lakh in Madhya Pradesh and 15 lakh in Andhra | जनावरांच्या ट्रकचे मध्य प्रदेशात दोन तर आंध्रात मिळतात १५ लाख

जनावरांच्या ट्रकचे मध्य प्रदेशात दोन तर आंध्रात मिळतात १५ लाख

Next
ठळक मुद्दे‘एमआयएम’ने मांडला हिशेब तस्करीचा सूत्रधार नागपुरातप्रत्येकच पोलीस ठाणे ‘लाभार्थी’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ७० जनावरांचा ट्रक मध्यप्रदेशात अवघ्या दोन लाखात मिळतो. परंतु याच ट्रकचे तेलंगणा-आंध्रप्रदेशात १५ ते १६ लाख रुपये मिळतात. ‘एमआयएम’च्या यवतमाळ शहर अध्यक्षाने बुधवारी पत्रपरिषदेत हा हिशेब मांडताना जनावर तस्करीच्या मार्गावरील पोलिसांचे लागेबांधेही उघड केले.
सोमवारी यवतमाळातील पांढरकवडा रोडवर जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटला होता. त्यात १६ जनावरांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ‘एमआयएम’वर पाठलाग केल्याचा आरोप गोवंश रक्षक संघटनांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’चे यवतमाळ शहराध्यक्ष शाज अहमद यांनी येथे पत्रपरिषद घेतली. ते म्हणाले, मध्यप्रदेशात गोवंश हत्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे तेथे कवडीमोल भावात जनावरे मिळतात. तेथील शेतातून जनावर तस्करीचा हा व्यवसाय चालतो. दीड ते दोन लाखात जनावरांचा ट्रक मिळतो. त्यात ६८ ते ७० जनावरे कोंबलेली असतात. हाच ट्रक आंध्रप्रदेशात सुखरुप पोहोचल्यास व त्यातील जनावरे जीवंत राहिल्यास या ट्रकला १५ ते १६ लाख रुपये भाव मिळतो.

आर्णी-लोणबेहळ प्रमुख मार्ग
जनावर तस्करीचे हे बहुतांश ट्रक आर्णी-लोणबेहळ मार्गे तेलंगणा-आंध्रप्रदेशात पोहोचतात. पोलिसांना खरोखरच जनावर तस्करी बंद करायची असेल तर या एका मार्गावर प्रामाणिकपणे तपासणी करणे गरजेचे आहे. राष्टय महामार्ग क्र. ७ वरूनसुद्धा अनेकदा पळवाटा शोधून ट्रक पास होतात. मध्यप्रदेशातून निघणारा जनावरांचा ट्रक आपल्या या मार्गातील सर्व पोलीस ठाण्यांना पैसे वाटत सुटतो. या तस्करांशी पोलिसांचे लागेबांधे असून तस्करीच्या मार्गावरील बहुतांश पोलीस ठाणे ‘लाभार्थी’ आहेत. अनेक ठिकाणी वरिष्ठांचाही त्यात सहभाग राहत असावा अशी शंकाही ‘एमआयएम’ने व्यक्त केली.

सूत्रधाराचा एलसीबीत तळ
‘एमआयएम’च्या सांगण्यानुसार, जनावर तस्करीतील मुख्य सूत्रधार हा नागपुरातील रहिवासी आहे. सोमवारी पांढरकवडा रोडवर अपघाताची घटना घडल्यानंतर हा सूत्रधार दुपारी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात बसून होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास त्याची ही बैठक सिद्ध होईल. आरटीओ चेक पोस्ट, महामार्ग पोलीस, यवतमाळ ग्रामीण, कळंब, यवतमाळ शहर, वडगाव रोड, आर्णी, एलसीबी असे सर्वच प्रमुख पोलीस ठाणे जनावर तस्करांना ‘मॅनेज’ आहेत. आपल्या हद्दीतून वाहन पास करून देण्यासाठी त्यांना ‘लाभ’ मिळतो.

कळंब तस्करीचे मुख्य केंद्र
येथील कळंब परिसर हा जनावर तस्करीचे मुख्य केंद्र आहे. तेथील शेतांमध्ये एकावेळी ४०० ते ५०० जनावरे राहतात. अनेकदा स्थानिक पातळीवरून ट्रक भरुन ते पुढे हैदराबादला पाठविले जातात. जनावरांच्या या तस्करीतूनच रात्रीचे अपघात वाढले आहेत. वाहन चोरी, जनावर चोरींच्या घटनाही वाढल्या आहेत.
तस्करीत आड येणाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. मलासुद्धा धमकी दिल्याचा आरोप शाज अहेमद यांनी केला. नागपूरवरून आलेल्या तीन तस्करांना आपण पकडून दिले. परंतु यवतमाळ शहर पोलिसांनी त्यांना कोणत्याही कारवाईशिवाय सोडून दिल्याचा आरोप एमआयएमने केला. पत्रपरिषदेला शाहबाज अहेमद, शेख साजीद व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विहिप-बजरंग दलाला आव्हान
विहिप-बजरंग दलाचे कार्यकर्ते गोवंश रक्षक म्हणून वावरत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचेही हितसंबंध असण्याची शक्यता पत्रपरिषदेत वर्तविण्यात आली. विहिप-बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना खरोखरच जनावर तस्करी थांबवायची असेल तर त्यांनी आपल्या सोबत यावे, आपण त्यांना अवैध कत्तलखाने, तस्करीचे रॅकेट व एकूणच माहिती देऊ, असे खुले आव्हान एमआयएमचे शहराध्यक्ष शाज अहेमद यांनी पत्रपरिषदेत दिले.

Web Title: The cattle truck gets two lakh in Madhya Pradesh and 15 lakh in Andhra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा