यवतमाळात खासगी टँकरवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:01 PM2018-04-24T22:01:46+5:302018-04-24T22:36:06+5:30

शहरात सुरू असलेला पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने खासगी टँकरला नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपशास बंदी घातली आहे.

Ban on private tankers in Yavatmal | यवतमाळात खासगी टँकरवर बंदी

यवतमाळात खासगी टँकरवर बंदी

Next
ठळक मुद्देएसडीओंचे आदेश : सार्वजनिक व वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी घेण्यास निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात सुरू असलेला पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने खासगी टँकरला नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपशास बंदी घातली आहे. या संदर्भातील आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत तीन महिन्यांपासून यवतमाळकर पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. नळाचे पाणी तीन आठवड्यानंतरच मिळत असल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. अनेकांकडे तीन आठवडे पाणी साठवून ठेवण्याची कुठलीच सोय नाही. या परिस्थितीचा फायदा घेत यवतमाळात पाण्याचा चक्क व्यापार सुरू झाला. सुरुवातीला ४०० रुपयात मिळणारे पाण्याचे टँकर ८०० रुपयांपर्यंत जावून पोहोचले आहे. शहरात नगरपरिषद आणि राजकीय पक्षांच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा होत आहे. मात्र हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने खासगी टँकरधारकांचे चांगभले होत आहे. पाण्याचा हा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने आता कडक पाऊले उचलली आहे.
पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ शहर यापूर्वीच टंचाईक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सुरुवातीला बोअरवेल खोदण्यावर आणि बांधकामांवर बंदी आणण्यात आली. परंतु खासगी टँकरधारक पाण्याचा वारेमाप उपसा करून पाणी विकत असल्याने जलस्त्रोत तळाला जात आहे. भूजल पातळीही वेगाने खाली जात आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी टँकरला शहरातून पाणी उपसा करण्यास बंदी आणली आहे. या आदेशानुसार, खासगी टँकरधारकांना सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपसण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ च्या नियम ५२ नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
यवतमाळ शहरात नगरपरिषदेच्या मोफत टँकरसोबतच राजकीय पक्षांच्या टँकरद्वारेही मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. आता खासगी टँकरला पाणी उपशास बंदी घातल्याने मोफत पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नगरपरिषदेत नोंदणी करावी लागणार आहे. या ठिकाणी टँकरचा नंबर देऊन कोणत्या भागात पाणीपुरवठा केला जातो, हेही सांगावे लागणार आहे. खासगी टँकरवर नियंत्रण आणण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. आता टँकरधारकांना पाणी आणण्यासाठी नगरपरिषद हद्दी बाहेरील जलस्त्रोंतांचा शोध घ्यावा लागणार आहे.
पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाची उपाययोजना
वॉशिंग सेंटरवरही बंदी
यवतमाळ शहरात खासगी टँकरला पाणी उपशास बंदी घालण्यापाठोपाठ शहरातील सर्व वाहनांच्या वॉशिंग सेंटरवरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करा
भीषण पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. घरातील नळांची गळती होऊ देऊ नये, खासगी बांधकामे पूर्णपणे बंद करावी, बाथरूममधील किंवा स्वयंपाकघरातील पाण्याला वाट करून देवून ते पाणी जमिनीत मुरविल्यास पाण्याचा स्तर वाढविण्यास मदत होईल. अंघोळ करताना शॉवरऐवजी बकेटमध्ये पाणी घेवून वापरावे. अतिरिक्त पाण्याचा वापर अंगणात किंवा बाहेर शिंपडण्यासाठी करू नये, पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Ban on private tankers in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.