कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच लाभ; शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:31 PM2019-03-18T14:31:23+5:302019-03-18T14:31:54+5:30

शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच खुल्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल ३०० ते ४०० रूपयांनी वधारले. या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होणार आहे.

Advantage of cotton yarn traders; Shot of farmers | कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच लाभ; शेतकऱ्यांना फटका

कापूस दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच लाभ; शेतकऱ्यांना फटका

Next
ठळक मुद्दे ‘पणन’ची खरेदी ३५ हजार क्विंटलवरच थांबली

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच खुल्या बाजारात कापसाचे दर प्रती क्विंटल ३०० ते ४०० रूपयांनी वधारले. या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होणार आहे. कमी उत्पादन आणि कमी दरामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
गतवर्षीच्या तुलनेल यावर्षी हमी दरात वाढ करून पणन महासंघाने कापूस खरेदीचा शुभारंभ केला. यानंतरही खुल्या बाजारात कापसाचे दर हमी दराखाली घसरले. शुभारंभाला उघडलेले पणनचे केंद्र अपुरे होते. अनेकांना हे केंद्र उघडे आहे काय, तेथे कापूस कसा विकावा, याची माहितीच मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची हिंमत केली. मात्र शासकीय केंद्रात कापूस विकला, तर चुकारा कर्जापोटी कापला जाईल आणि चुकाराही उशिरा मिळेल, या भीतीने शेतकऱ्यांनी या केंद्रात कापूसच नेला नाही.
राज्यात पणन महासंघाने ४३ केंद्र उघडले होते. त्यातील केवळ नऊ केंद्रावरच शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला होता. परिणामी आत्तापर्यंत केवळ ३५ हजार ७५८ क्विंटल कापसाचीच खरेदी पणन महासंघाला करता आली आहे.
या स्थितीचा लाभ घेत राज्यातील व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी २३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. कमी दरात व्यापाऱ्यांनी हा कापूस खरेदी केला. आता शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपल्यानंतर बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. हे दर क्विंटलमागे २०० ते ५०० रूपयांनी अधिक आहे. मात्र या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होणार आहे.
जागतिक बाजारात रूपयाच्या दरात घसरण झाल्याने खुल्या बाजारात कापसाचे दर वधारण्यास सुरूवात झाली आहे. यासोबतच रूईच्या दरात मोठी सुधारणा झाली. क्विंटलला दोन हजार ५५० रूपयांचे दर मिळत आहे. सुताच्या दरामध्येही सुधारणा झाली. या सर्व बाबींचा परिणाम खुल्या बाजारात कापसाचे दर वधारण्यावर झाला आहे. सध्या कापसाला प्रती क्विंटल पाच हजार ८०० रूपयांचा दर मिळात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये कापसाच्या दरात तेजी आहे. आता हे दर सहा हजार रुपये प्रती क्विंटलवर जातील काय, याची प्रतीक्षा कापसाचा संचय असणाऱ्या शेतकऱ्यांना आहे. तथापि कापूस साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र नगण्य आहे.

निवडणुकीत दाक्षिणात्य कॉटन लॉबी वरचढ
निवडणुकीच्या काळात दाक्षिणात्य कॉटन लॉबी दरवेळी वरचढ असते. ही लॉबी दर पाच वर्षानंतर वेगळी चाल खेळते. यावेळी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन या लॉबीने कमी दरात कापूस खरेदी करून त्याचा स्टॉक करून ठेवला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी कापूस गाठी निर्यातीसाठी तयार ठेवल्या आहेत. या निर्यातीला मार्च अखेरीस परवानगी मिळाली. यामुळे कमी दरात खरेदी झालेल्या कापसाच्या गाठीवर व्यापाऱ्यांना बक्कळ नफा मिळण्यास मदत झाली आहे. यात शेतकऱ्यांचेच नुकसान झाले आहे.

सीसीआयने केंद्र गुंडाळले
खुल्या बाजारात हमी दरापेक्षा क्विंटलमागे ४०० रूपयांचे दर जादा आहे. यामुळे सीसीआयच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांयांनी पाठ फिरविली. या केंद्रांवर पाच हजार ४५० रूपये क्विंटल दराने कापूस खरेदी होत आहे. १० लाख क्विंटल कापूस सीसीआयने आत्तापर्यंत खरेदी केला आहे. दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कापूस विक्री सुरू केली. यामुळे सीसीआयचे केंद्र ओस पडले. परिणामी सीसीआयला आपले खरेदी केंद्र गुंडाळावे लागले.

Web Title: Advantage of cotton yarn traders; Shot of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस