यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ तारखेपासून ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:50 AM2018-01-17T10:50:14+5:302018-01-17T10:53:37+5:30

विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे साहित्य संमेलन १९ ते २१ जानेवारीदरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात संपन्न होत आहे.

66th Vidarbha Sahitya Sammelan in Wani, Yavatmal District | यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ तारखेपासून ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ तारखेपासून ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री येणार विविध कार्यक्रमांची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे साहित्य संमेलन १९ ते २१ जानेवारीदरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात संपन्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्षपदी प्रख्यात लेखक डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे राहतील.
शुक्रवारी दुपारी २ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री मदन येरावार व संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ‘बारोमास’कार डॉ.सदानंद देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

सकाळी ग्रंथदिंडी
शुक्रवारी सकाळी १० वाजता नगरवाचनालय ते शेवाळकर परिसर अशी ग्रंथदिंडी निघणार आहे. उद्घाटनाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर, संमेलन समितीच्या आमंत्रक शुभदा फडणवीस तसेच स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित राहतील.

सायंकाळी कवी संमेलन
उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० वाजता कवीवर्य प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित आहे. रात्री ८ वाजता संजय भाकरे फाऊंडेशन निर्मित ‘बाप हा बापच असतो’ या नाटकाचे आयोजन आहे.

‘शेतकऱ्यांची दैना’वर विचारमंथन
शनिवारी २० जानेवारीला सकाळी ९ वाजता डॉ.प्रज्ञा आपटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘संतांंचे समाजभान’ या विषयावर तर ११ वाजता खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेतकऱ्यांची दैना आणि आपण सगळे’ या विषयावर विचारमंथन होईल.

विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत
दुपारी १ वाजता कवीवर्य विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत बाळ कुळकर्णी घेतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अजय आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आधुनिक तंत्रज्ञानाचे अभिजात साहित्य आणि कलेला आव्हान’ या विषयावर परिसंवाद आणि त्यानंतर ५ वाजता दीपक आसेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कवी संमेलन होईल. रात्री ८ वाजता ‘वैदर्भीय गीतगंगा’ हा लोकप्रिय मराठी गितांचा कार्यक्रम होईल.

‘माध्यमांची बांधिलकी आणि अभिव्यक्ती’वर परिसंवाद
रविवारी २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ.अभय बंग हे ‘विनोबा: शांतता कोर्ट चालू आहे’ या विषयावर बोलतील. सकाळी ११ वाजता बालाजी सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन रंगणार आहे. संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता ‘माध्यमांची बांधिलकी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर परिसंवाद रंगणार आहे.
दुपारी २ वाजता केंद्रीय भूपृष्ठ आणि जहाजबांधणी व नदीविकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.

Web Title: 66th Vidarbha Sahitya Sammelan in Wani, Yavatmal District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.