जिल्ह्यातील जंगलात वन्य प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:26 PM2018-05-26T22:26:49+5:302018-05-26T22:26:49+5:30

भीषण पाणीटंचाई व तीव्र उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यातील जंगलांमध्ये वन्य प्राण्यांसाठी एकूण ६६७ पाणवठे कार्यान्वित करण्यात आले असून तेथे बोअरवेल व सौर ऊर्जेद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

667 waterfalls for wild animals in the forest of the district | जिल्ह्यातील जंगलात वन्य प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे

जिल्ह्यातील जंगलात वन्य प्राण्यांसाठी ६६७ पाणवठे

googlenewsNext
ठळक मुद्दे४०२ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती : बोअरवेल, सौरपंपांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भीषण पाणीटंचाई व तीव्र उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यातील जंगलांमध्ये वन्य प्राण्यांसाठी एकूण ६६७ पाणवठे कार्यान्वित करण्यात आले असून तेथे बोअरवेल व सौर ऊर्जेद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
यवतमाळ वनवृत्तांतर्गत जिल्ह्यात पांढरकवडा, पुसद व यवतमाळ हे विभाग कार्यरत आहे. याशिवाय टिपेश्वर व पैनगंगा ही अभयारण्ये वन्यजीव विभागांतर्गत कार्यरत आहेत. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १३ हजार ५८४ चौरस किलोमीटर असून त्यात वनक्षेत्र दोन हजार १६८ चौरस किलोमीटर इतके आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १५.९६ टक्के इतके जंगल जिल्ह्यात आहे. जैव विविधतेने नटलेल्या या जिल्ह्यातील जंगलांमध्ये मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची तसेच विविध पक्षांची रेलचेल आहे.
गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या अर्धाच पाऊस झाल्याने नागरी वस्त्यांमध्ये नव्हे तर जंगलातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम जंगलातील वन्य प्राण्यांची तहान भागविणाऱ्या पाणवठ्यांवर होऊ लागला आहे. पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची भटकंती सुरू असून अनेकदा ते नागरी वस्त्या, शेतांमध्ये शिरकाव करतात. त्यातूनच प्राण्यांचे मानवी हल्ले वाढले आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी वनवृत्ताच्या अख्त्यारितील जंगल व अभयारण्यात पाणवठे निर्माण करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ६६७ पाणवठे असून त्यात २२५ नैसर्गिक, ४०२ कृत्रिम, तर ४० पाणवठे हे सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा करून चालविले जातात. सर्वाधिक २२६ पाणवठे पांढरकवडा विभागात आहे. त्या खालोखाल यवतमाळमध्ये १५५, तर पुसद विभागात १२३ पाणवठे आहेत. कृत्रिम पाणवठ्यांची सर्वाधिक १९२ संख्यासुद्धा पांढरकवडा विभागात आहे. बोअरवेल व सौर ऊर्जेद्वारे या पाणवठ्यांमध्ये अधिकाधिक पाणी उपलब्ध करून दिले जात असून वनविभागाकडून वन्य प्राण्यांना जंगलातच रोखण्याचा प्रयत्न होतो आहे. पाणवठ्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी विष कालविण्यासारखे प्रकार होऊ नये याची खबरदारी वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. या पाणवठ्यांवर संयुक्त वनव्यवस्थापन समिती सदस्यांचीही देखरेख आहे. स्वयंसेवी संस्थांचाही वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सहभाग लाभतो आहे.
जिल्ह्यात दोन अभयारण्य
यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर, पैनगंगा-इसापूर ही दोन अभयारण्ये आहेत. या अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये बिबट, वाघ, तडस, लांडगा, कोल्हा, अस्वल यासारखे मांसभक्षी तर चितळ, सांबर, नीलगाय, वानर, रानडुक्कर, ससे आदी तृणभक्षी प्राणी आहेत. या जंगलांमध्ये विपूल प्रमाणात पक्षांची विविधताही अस्तित्वात आहे.

Web Title: 667 waterfalls for wild animals in the forest of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल