भटक्यांच्या पालातील खड्ड्यात ५१ मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:07 PM2018-03-18T23:07:31+5:302018-03-18T23:07:31+5:30

भटक्यांच्या पालात खड्ड्यात पुरुन ठेवलेले ५१ महागडे मोबाईल आढळण्याची खळबळजनक घटना महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.

 51 mobile in potholes | भटक्यांच्या पालातील खड्ड्यात ५१ मोबाईल

भटक्यांच्या पालातील खड्ड्यात ५१ मोबाईल

googlenewsNext
ठळक मुद्देहिवरा संगमचा प्रकार : बाजारातील चोरीने बिंग फुटले

ऑनलाईन लोकमत
महागाव/हिवरासंगम : भटक्यांच्या पालात खड्ड्यात पुरुन ठेवलेले ५१ महागडे मोबाईल आढळण्याची खळबळजनक घटना महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. गुंज येथील बाजारात मोबाईल चोरट्याला नागरिकांनी पकडल्यानंतर मोबाईल चोरीचे हे रॅकेटच पोलिसांच्या हाती लागले. महागाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
महागाव तालुक्यात गत काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. गुंज येथे शनिवारी असलेल्या बाजारात नागरिकांनी एका मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यावरून पोलिसांनी रविवारी पहाटे हिवरासंगम येथील गावाबाहेर असलेल्या पालावर धाड टाकली. त्या ठिकाणी पालात खड्डा खोदून ५१ मोबाईल लपवून ठेवल्याचे आढळून आले. पालातील खड्ड्यातून महागडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. दरम्यान या प्रकरणी बाबू उर्फ बाबय्या सुरगुडू (२८), एम. रामलू लक्ष्मणय्या (३६), एम. सामलू लक्ष्मणय्या (३०) सर्व रा. हैदराबाद यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या पालातून मोबाईल हस्तगत केले.
महागाव शहरासह तालुक्यात अनेक महागडे मोबाईल गत काही दिवसांपासून चोरीला जात होते. अनेक पोलिसांचेही मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे. आता या टोळीचा छडा नागरिकांच्या सतर्कतेनेच लागला आहे. आंध्रप्रदेशातील असलेल्या या मोबाईल चोरट्यांच्या टोळीत आणखी सदस्यांचा समावेश असावा असा कयास आहे.
जिल्ह्यात दररोज मोबाईलच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. आठवडी बाजारासह गर्दीच्या ठिकाणी महागडे मोबाईल अलगद लंपास केले जात आहे. परंतु चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान महागाव पोलिसांनी ही टोळी पकडल्याने मोबाईल चोरट्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
भीक मागण्याच्या नावाखाली चोरी
मोबाईल चोरट्यांच्या टोळीत काही अल्पवयीन मुलेही आहेत. भीक मागण्याच्या नावाखाली गर्दीत शिरुन महागडे मोबाईल लंपास करीत होते. चोरलेले मोबाईल ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणच्या पालात खड्डा करून पुरले जात होते. त्यानंतर या मोबाईलची विल्हेवाट लावली जात होती.

Web Title:  51 mobile in potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.