‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या गावातही पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 04:01 PM2019-05-15T16:01:30+5:302019-05-15T16:01:58+5:30

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाण्याची गरज पूर्ण झाल्याच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील तब्बल ४६९ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ ठरली आहेत.

Water scarcity in the village 'water neutral'! | ‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या गावातही पाणीटंचाई !

‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या गावातही पाणीटंचाई !

Next

- संतोष वानखडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाण्याची गरज पूर्ण झाल्याच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील तब्बल ४६९ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ ठरली आहेत. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या जवळपास १०० पेक्षा अधिक गावांत तिव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जाते. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने उपरोक्त ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या ४६९ गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. जिल्ह्यात एकूण ७९३ महसूली गावे असल्याने आणि कृषी विभागाच्या लेखी ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झालेली असल्याने उर्वरीत ३२४ गावांत पाणीटंचाई निर्माण होणे अपेक्षीत होते. मात्र, जिल्हा प्रशासनानेच जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई जाहिर करून कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यामुळे येथे नेमकी चुक कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झालेली असेल तर ५०० गावांत कोणत्या आधारावर पाणीटंचाई जाहिर करण्यात आली आणि ५०० गावांत खरोखरच पाणीटंचाई असेल तर ४६९ गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये कोणत्या आधारावर करण्यात आला, या दृष्टिने पडताळणी होणे आवश्यक ठरत आहे.


वॉटर न्यूट्रल यादीतील गावांचे फेरसर्वेक्षण झाल्यास वस्तुस्थिती येईल समोर !
शेती प्रयोजनाकरिता लागणाºया पाण्यासह जनावरे, गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत जलसंधारणाची कामे केली जात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या तालुकास्तरीय समितीकडून सर्वेक्षण केले जाते. या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तर सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी असतात. त्या-त्या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी काढली जाते. १०० टक्केवारी असलेल्या गावाची पाण्याची गरज पूर्ण झाल्याची शहानिशा केली जाते. त्यानंतरच संबंधित गावाचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश केला जातो. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई असल्याने फेर सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अनेकवेळा केली. मात्र, अद्याप फेर सर्वेक्षण करण्यात आले नाही.


सन २०१५-१६ मध्ये २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. ही सर्व गावे वॉटर न्यूट्रल ठरली आहेत. सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जवळपास १४०० कामे पूर्ण झाली आहेत.
- दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Water scarcity in the village 'water neutral'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.