Washim: The request given to the chair of Mansora Tehsildar! | वाशिम : मानोरा तहसीलदारांच्या खुर्चीला दिले निवेदन!

ठळक मुद्देकाँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : नाफेडद्वारा तूर खरेदी करावी, कोरेगाव भीमा येथील घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांना तहसीलदार अनुपस्थित आढळले. शेवटी मानोरा तालुका काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांच्या खुर्चीलाच निवेदन दिले.
मानोरा येथील शेतकर्‍यांच्या तूर  पिकाच्या सोयीकरिता नाफेडमार्फत खरेदी करणे आवश्यक आहे. मागील वर्षीसुद्धा तूर, सोयाबीन, उडीद, मूग आदी शेतमालाची नाफेडमार्फत खरेदी केली नाही. किमान यावर्षी तरी १५ जानेवारीपर्यंत नाफेडद्वारा तूर व्हावी, या मागणीसाठी काँग्रेसचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. तेथे तहसीलदार उपस्थित नसल्याचे पाहून या पदाधिकार्‍यांनी खुर्चीला निवेदन दिले. या निवेदनात नमूद आहे, की १५ जानेवारीपर्यंत नाफेडद्वारा तूर खरेदी सुरू करावी, अन्यथा १६ जानेवारी रोजी  रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर काँग्रेसचे नेते अरविंद इंगोले, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, खविसंचे अध्यक्ष सुरेंद्र देशमुख, बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष इफ्तेखार पटेल, सुभाष राठोड, कपिल राठोड, संतोष राऊत, गजानन भवाने, अशोकराव देशमुख, रामनाथ राठोड, डॉ.अशोक करसडे, वसंता भगत, मधुसुदन राठोड, भारत आडे, तुषार पाटील, हरसिंग चव्हाण, गोविंद भोरकडे, अरविंद राऊत, महेश राऊत, भावसिंग राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत. 

दुपारी ३ वाजेपर्यंत मी कार्यालयात होतो. कोरेगाव भीमा घटनेचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर मी कामानिमित्त थोडा वेळ बाहेर गेलो होतो. त्यादरम्यान तालुका काँग्रेसचे पदाधिकारी आले होते. 
डॉ.सुनील चव्हाण, तहसीलदार मानोरा.