Soybean Bonus deposited in 44 thousand farmers' bank accounts in Washim district! | वाशिम जिल्ह्यातील ४४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘सोयाबीन बोनस’ची रक्कम जमा !

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समित्या आणि तालुका सहायक निबंधकांकडून तालुकास्तरीय प्रस्ताव मागवून घेतले होते.नोव्हेंबर महिन्यात बोनसची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकºयांकडून बँक खाते मागविण्यात आले. बँक खाते क्रमांक पडताळणीअंती बोनसचा लाभ देण्यात आला.

वाशिम - शासनाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस देण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ कोटी ५४ लाख २४१ रुपये बोनस वाटप करण्यात आले. बँक खाते क्रमांक पडताळणीअंती बोनसचा लाभ देण्यात आला.
शासनाने १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत सोयाबीन विकणाºया शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये आणि कमाल २५ क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समित्या आणि तालुका सहायक निबंधकांकडून तालुकास्तरीय प्रस्ताव मागवून घेतले होते. तालुकास्तरीय प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यास सुरूवातीला प्रचंड विलंब झाला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तालुका सहायक निबंधक आणि तालुकास्तर समित्यांना १० पत्रे आणि ४ अतिरिक्त शासकीय पत्रेही पाठविण्यात आली होती. प्रचंड विलंबानंतर जुलै २०१७ मध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सर्व प्रस्ताव पणन संचालक पुणे यांचेकडे पाठविले होते. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४५ हजार शेतकरी अनुदानासाठी पात्र असून, बाजार समित्यांकडे विकलेल्या एकूण ७ लाख ३९ हजार ५६७ क्विंटल सोयाबीनच्या अनुदानासाठी १४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी नोंदविली होती. नोव्हेंबर महिन्यात बोनसची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बँक खाते मागविण्यात आले. बँक खाते क्रमांकांची पडताळणी केल्यानंतर अचूक बँक खाते क्रमांकावर बोनसची रक्कम जमा करण्यात आली. आतापर्यंत  ४४ हजार ५३२ शेतकºयांच्या बँक खात्यात १३ कोटी ५४ लाख २४१ रुपये बोनस वाटप करण्यात आले.