ठळक मुद्देमहावितरणची धडक मोहिमपहिल्या दिवशी वसूल झाले २७ लाख रुपये

वाशिम: महावितरणच्या जिल्हाभरातील घरगुती वीज ग्राहकांकडे २० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी प्रलंबित असून ती वसूल करण्यासाठी महावितरणने बुधवारपासून धडक मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत पहिल्याच दिवशी ७११ ग्राहकांकडून २६ लाख रुपये वसूल करण्यात आले; तर देयक भरण्यास टाळाटाळ करणाºया २५५ ग्राहकांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांनी गुरूवारी दिली.

विद्यूत देयक भरण्यास काही ग्राहकांकडून टाळाटाळ केली जात असल्याने थकबाकीचा आलेख दिवसागणिक उंचावतच चालला आहे. ही थकबाकी वसूल करित असताना महावितरणच्या अक्षरश: नाकीनऊ येत असून वारंवार पाठपुरावा करूनही ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अखेर कठोर पावले उचलत कारवाईचा धडाका अवलंबिण्यात आला आहे. त्यानुसार, अधिक थकबाकीच्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात असून अधिक थकबाकी अथवा वीजचोरीचा प्रकार आढळल्यास संबंधितांची वीज कायमस्वरूपी खंडित करण्याची कारवाई देखील केली जात असल्याचे बेथारिया यांनी सांगितले.

धडक मोहिमेंतर्गत बुधवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ७११ ग्राहकांकडून २६ लाख रुपये थकबाकी वसूल करण्यात आली. २५५ ग्राहकांचा तात्पुरता; तर ११० ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस ही मोहिम जिल्हाभरात राबविली जाणार असून ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करित त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा करावी आणि अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता बेथारिया यांनी केले आहे.