ऑनलाइन लोकमत
मानोरा : स्थानिक पंचायत समितीची मासिक सभा १९ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असतानाच पृथ्वीराज उल्हास राठोड (वय ४० वर्षे) यांनी तेथे येऊन नाहक वाद घातला. यासह कागदपत्रे, टेबल-खुर्च्या आदींची फेकफाक केली. अशा आशयाच्या पंचायत समिती सदस्य सुनील राठोड आणि गटविकास अधिकारी गुलाब राठोड यांच्या स्वतंत्ररित्या दाखल तक्रारींवरून आरोपी पृथ्वीराज राठोड यांच्याविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
मानोरा पंचायत समिती सदस्य सुनील राठोड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की पंचायत समितीची मासिक सभा असल्याने १९ मे रोजी पंचायत समिती कार्यालयात सदस्यांसह गटविकास अधिकारी राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी बेबीनंदा डेरे व शिक्षण विभागातील इतर कर्मचारी हजर असताना तेथे पृथ्वीराज राठोड याने येवून ह्यतू माझ्याविरूद्ध घेतलेला ठराव रद्द करह्ण, असे म्हणत शिविगाळ केली, अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पृथ्वीराज राठोड यांच्याविरूद्ध कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
यासह मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुलाब राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आस्थापना विभागात पं.स.सदस्य सुनील राठोड यांच्यासोबत बसलेलो असताना पृथ्वीराज राठोड याने कुठलेच कारण नसताना तेथे येवून शिविगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि कागदपत्रे, टेबल-खुर्च्यांची फेकफाक करून कामात व्यत्यय निर्माण केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी पृथ्वीराज राठोड यांच्याविरूद्ध पुन्हा कलम १८६ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही घटनांचा पुढील तपास बीट जमादार सुभाष महाजन, संदिप बरडे करित आहेत.