मंगरुळपीरचा ऐतिहासिक दर्गाह होतोय शिकस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 02:48 PM2018-01-23T14:48:06+5:302018-01-23T14:48:11+5:30

जिल्ह्यासह देशभरात प्रसिद्ध असलेला आणि जगभरातील मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या दर्गाहमध्ये मंगरुळपीर येथील हजरत दादा हयात कलंदर बाबांच्या दर्गाहचा समावेश आहे

The historic Dargah of Mangarulpeer is in bad condition | मंगरुळपीरचा ऐतिहासिक दर्गाह होतोय शिकस्त

मंगरुळपीरचा ऐतिहासिक दर्गाह होतोय शिकस्त

googlenewsNext

वाशिम:  जिल्ह्यासह देशभरात प्रसिद्ध असलेला आणि जगभरातील मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या दर्गाहमध्ये मंगरुळपीर येथील हजरत दादा हयात कलंदर बाबांच्या दर्गाहचा समावेश आहे. तब्बल चौदाशे वर्षांपुर्वीचा हा दर्गाह आता शिकस्त होत असून, हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुरातत्त्व विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी मुस्लिम करीत आहेत. 

मंगरुळपीर येथील हजरत दादा हयात कलंदर दर्गाहला पीरबाबांचा दर्गाह म्हणूनही ओळखले जाते. या दर्गाहवरूनच मंगरुळपीर शहराचे नाव मंगरुळपीर, असे पडले आहे. सुमारे चौदाशे वर्षांपूर्वी मंगरुळपीर येथे पीरबाबांनी मंगलू नावाच्या दैत्याचा पराभव केल्यानंतर शहराला मंगरुळपीर, असे नाव पडले आणि त्या काळातच या दर्गाहची उभारणी झाली, अशी आख्यायिका रुढ आहे. वेगवेगळी कारणे आणि उदाहरणे सांगण्यात येत असली तरी, हा दर्गाह सर्वधर्मियांसाठी श्रद्धास्थानही आहे. केवळ मुस्लिम बांधवच नव्हे, तर सर्व समाजबांधव श्रद्धेने या ठिकाणी दर्शनासाठी येतात. एखाद्या भव्य किल्ल्यासारखा हा दर्गाह आहे. मागील काही वर्षांपासून हा दर्गाह जीर्ण होत चालला आहे. भव्य असलेल्या इमारतींना तडा पडून त्या खचत आहेत. सद्यस्थितीत या दर्गाहचे मुख्य विश्वस्त जहाँगिरदार कुटूंब असून, त्यांच्या मार्गदर्शनात मुस्लिम बांधव या दर्गाहची किरकोळ डागडुजी आणि रंगरंगोटी करून तो जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील तीन वर्षांपूर्वी अतिपावसामुळे या दर्गाहच्या मागच्या बाजूची भव्य भिंत कोसळलीही होती. त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्र विकासकामांतर्गत या दर्गाहच्या डागडुजीसाठी थोडाफार निधी शासनाकडून मिळाला होता; परंतु त्यानंतर आजवर या दर्गाहची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. अशीच स्थिती राहिली, तर हा ऐतिहासिक दर्गाह नामशेष होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: The historic Dargah of Mangarulpeer is in bad condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.