शिरपूरमध्ये जुना, कमी क्षमतेचा ‘ट्रान्सफॉर्मर’ शेतकऱ्यांनी केला परत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 03:12 PM2018-10-22T15:12:17+5:302018-10-22T15:18:50+5:30

शिरपूर परिसरातील खंडाळा उपकेंद्रातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यातील कामरगाव उपकेंद्रात १७ सप्टेंबरला स्थलांतरीत केले.

farmers returned Transformer in shivapur | शिरपूरमध्ये जुना, कमी क्षमतेचा ‘ट्रान्सफॉर्मर’ शेतकऱ्यांनी केला परत

शिरपूरमध्ये जुना, कमी क्षमतेचा ‘ट्रान्सफॉर्मर’ शेतकऱ्यांनी केला परत

शिरपूर जैन (वाशिम) : शिरपूर परिसरातील खंडाळा उपकेंद्रातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कारंजा तालुक्यातील कामरगाव उपकेंद्रात १७ सप्टेंबरला स्थलांतरीत केले. या ‘ट्रान्सफॉर्मर’ऐवजी कमी क्षमतेचा व जूना ‘ट्रान्सफॉर्मर’ 22 ऑक्टोबर रोजी खंडाळा उपकेंद्रात आणताच, शेतकऱ्यांच्या रोषाला संबंधितांना सामोरे जावे लागले. ऊर्जामंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी जूने ‘ट्रान्सफॉर्मर’ परत वाशिमला पाठविले.

शिरपूर येथील ई-क्लास जमिनीवर खंडाळा वीज उपकेंद्राचे उद्घाटन १७ मे २०१७ रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले होते. या उपकेंद्रातील खंडाळा, दापूरी खुर्द, शेलगाव या फिडरचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना १७ सप्टेंबर २०१८ रोजी महावितरणने ‘जोर का झटका’ दिला. खंडाळा उपकेंद्रातील ‘ट्रान्सफॉर्मर’ कामरगाव उपकेंद्रात नेण्यात आले. सदर ‘ट्रान्सफॉर्मर’ परत खंडाळा उपकेंद्रात आणण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित झनक यांच्यासह विविध पक्षांनी केली होती.  झनक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांच्याशी चर्चाही केली होती. २२ ऑक्टोबर रोजी महावितरणच्यावतीने खंडाळा उपकेंद्रासाठी ‘ट्रान्सफॉर्मर’ ट्रकमध्ये आणण्यात आले. 

मात्र, सदर ‘ट्रान्सफॉर्मर’ कमी क्षमतेचा तसेच जूना असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोले यांच्यासह शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत ऊर्जामंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. कमी क्षमतेचा व १९८२ मध्ये निर्मिती दिनांक असलेला हा ‘ट्रान्सफॉर्मर’ परत वाशिमला नेण्यात यावा आणि नवीन व पुरेशा क्षमतेचा ‘ट्रान्सफॉर्मर’ देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ‘ट्रान्सफॉर्मर’ परत वाशिमला नेण्यात आला. नवीन ‘ट्रान्सफॉर्मर’ न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी दामोधर इंगोले, बबनराव मिटकरी, नाथा शिंदे, विश्वनाथ वाघ, विष्णू शिंदे, कैलास शिंदे, ज्ञानबा शिंदे, बबन शिंदे, प्रशांत शिंदे, सतीश पवार, पांडुरंग शिंदे, रामेश्वर शिंदे, मदन काठोळे, अंकूश शिंदे, नंदू शिंदे यांच्यासह शिरपूर, वसारी, तिवळी, वाघी, खंडाळा, कोठा, शेलगाव, ताकतोडा, ढोरखेडा परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: farmers returned Transformer in shivapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम