Educational trips underway in the school! | शाळांतर्गत शैक्षणिक सहली बंद होण्याच्या मार्गावर!
शाळांतर्गत शैक्षणिक सहली बंद होण्याच्या मार्गावर!

ठळक मुद्देजाचक अटींमुळे वाढल्या अडचणी शिक्षकांचा त्रास बळावला!

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : विद्यार्थी दशेत सदोदित हवीहवीशी वाटणारी शैक्षणिक सहल विविध स्वरूपातील जाचक अटींमुळे कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. सहलीकरिता केवळ परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचाच वापर करण्याचे बंधन असून, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांकडून उदासीनता बाळगली जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून एकही सहल निघाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिक्षण उपसंचालकांकडून गतवर्षी जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी एस.टी. बस अथवा अन्य शासकीय मान्यताप्राप्त असलेल्या तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी मंजुरी दिलेल्या वाहनांमधूनच सहल काढता येऊ शकते. मात्र, एस.टी. बसेस उपलब्ध करण्यासाठी शाळांची पुरती धांदल उडत असून, आगार व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यापासून बस उपलब्ध होईपर्यंत मोठा कालावधी लागत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे पालक, संस्थाध्यक्ष, शिक्षण विभागाची परवानगीदेखील यासाठी बंधनकारक असल्याने बहुतांश शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी शैक्षणिक सहल काढण्याबाबत उदासीनता बाळगली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जाचक अटींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

शैक्षणिक सहलीदरम्यान अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने काही नियम घालून दिले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच बाहेर जगाचीही माहिती व्हावी, यासाठी शैक्षणिक सहल आवश्यक असून, त्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी अटींची पूर्तता करून शैक्षणिक सहलींचे आयोजन करायला हवे. 
- डॉ. ज्ञानेश्‍वर नागरे
माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम
 


Web Title: Educational trips underway in the school!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.