Dangerous Hour: An alarming decline in the Bhujal level in Washim district! | धोक्याची घंटा : वाशिम जिल्हय़ात भुजल पातळीत चिंताजनक घट!
धोक्याची घंटा : वाशिम जिल्हय़ात भुजल पातळीत चिंताजनक घट!

ठळक मुद्देपाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने खालावली पाणीपातळी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे  जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा तालुक्यांच्या भूजल पातळीत लक्षणीय घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत मागील पाच वर्षांत सरासरी १.७६ मीटरने अर्थात पाच फुटाहून अधिक घटली आहे. अनिबर्ंध पाणी उपशामुळे भूजल पातळी घटत असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे.
जिल्ह्यात सरासरी ७९८.७0 मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी-अधिक होऊ लागली. मात्र सर्व धरणांमध्ये पाणीसाठा पुरेसा होत असल्याने फारशी पाणी टंचाई जाणवत नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: दख्खन बस्तर लाव्हा या प्रकारच्या खडकाचे आहे; पूर्णपणे बेसॉल्टने आच्छादित असलेल्या या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तराची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा होण्यास मदत होते; परंतु  पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या ५ वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस फारसा जिल्ह्यात पडलेला नाही. पडणार्‍या पावसाचा कालावधी कमी झाल्याने, तसेच पडलेल्या पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. 
जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील मिळून प्रायोगिक तत्वावर ७९  विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २0१३ ते २0१८ ची सरासरी पाणी पातळी आणि जानेवारी २0१८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात भूजल पातळी सरासरी १.७६ मीटरने घटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामध्ये कारंजा २.४१, रिसोड १.१८, मंगरुळपीर १.५३, वाशिम १.९३, मालेगाव १.३३ आणि मानोरा २.२३ असे भूजल पातळीचे तालुकानिहाय घटलेले प्रमाण आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अभियानाबरोबरच पाणी उपशावर निबर्ंध घालण्याची आवश्यकता आहे. भूजल पातळी घटल्याचा सर्वाधिक फटका बोअरवेल खोदाईला बसला आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सरासरी १५0 ते २00 फुटांपर्यत बोअरवेल खोदाई केली जात होती, पण गेल्या दोन वर्षांपासून ही खोदाई ३00 फुटांपयर्ंत पोहोचली आहे.

कारंजातील स्थिती सर्वात गंभीर!
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासह कारंजा तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने गतवर्षी अर्थात २0१७ मध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची मोठय़ा प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. तथापि, याच तालुक्यातील भूजल पातळी ही जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात घटली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष जानेवारी २0१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार या तालुक्यातील भूजल पातळी मागील पाच वर्षांत सरासरी २.४१ मीटरने घटली आहे. त्यामुळे या तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे उपयुक्त आहेत की नाही, ही बाब विचार करण्यास भाग पाडणारी आहे.


Web Title: Dangerous Hour: An alarming decline in the Bhujal level in Washim district!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.