धरणे कोरडीच; मत्स्यव्यवसाय सापडला संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:40 PM2019-07-15T14:40:59+5:302019-07-15T14:43:26+5:30

जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्याने मत्स्यउत्पादक संस्थांसह मत्स्यविक्रेतेही चिंतातूर झाले आहेत.

The dams in Washim is dry; Fishery business found in trouble! | धरणे कोरडीच; मत्स्यव्यवसाय सापडला संकटात!

धरणे कोरडीच; मत्स्यव्यवसाय सापडला संकटात!

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात प्रामुख्याने कतला, सायप्रनस, रोहू, मिरगल नामक माशांचे उत्पादन होते.बोटावर मोजण्याइतक्या धरणांचा अपवाद वगळता बहुतांश धरणे कोरडी असल्याने बिज सोडण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. अपेक्षित जलसाठा न झाल्यास मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मत्सव्यवसायाकरिता राखीव ठेवल्या जाणाऱ्या धरणांमध्ये साधारणत: जुलै महिन्यात मत्स्यबिज टाकले जाते. यंदा मात्र हा महिना अर्धाअर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झाला नसल्याने धरणे कोरडीच आहेत. यामुळे जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय संकटात सापडला असून त्यावर विसंबून असणारी हजारो कुटूंब चिंताग्रस्त झाली आहेत.
जिल्ह्यात लघू आणि मध्यम अशी एकंदरित १३४ धरणे आहेत. त्यापैकी सुमारे १०० धरणांमध्ये दरवर्षी मत्स्यपालन केले जाते. ज्या अधिकृत संस्थांना मत्स्यपालनाकरिता ही धरणे दिली जातात, त्यांच्याकडून साधारणत: जुलै महिन्यात धरणांमध्ये मत्स्यबिज सोडले जाते. यावर्षी मात्र जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही अद्यापपर्यंत दमदार पाऊस न झाल्याने मत्स्यउत्पादक संस्थांसह मत्स्यविक्रेतेही चिंतातूर झाले आहेत.
मत्स्योत्पादनासंबंधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रामुख्याने कतला, सायप्रनस, रोहू, मिरगल नामक माशांचे उत्पादन होते. त्याचे बिज साधारणत: जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून आॅगस्ट महिन्याच्या १५ तारखेपर्यंत धरणांमध्ये सोडल्यास माशांची नैसर्गिकरित्या चांगली वाढ होणे शक्य आहे; मात्र यंदा बोटावर मोजण्याइतक्या धरणांचा अपवाद वगळता बहुतांश धरणे कोरडी असल्याने बिज सोडण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत संततधार पाऊस होऊन धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा न झाल्यास मत्स्योत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


शासकीय मत्स्यबिज केंद्राचा जिल्ह्यात अभाव!
वाशिमला जिल्ह्याचा दर्जा मिळून २१ वर्षे होत असतानाही जिल्ह्यात अद्यापपर्यंत शासकीय मत्स्यबिज केंद्र सुरू झालेले नाही. अकोला आणि वाशिम असे दोन जिल्हे मिळून महानच्या धरणाजवळ असलेल्या शासकीय मत्स्यबिज केंद्रावरून काही संस्था मत्स्यबिज खरेदी करतात; परंतु पुरेशा प्रमाणात बिज मिळत नसल्याने अनेकांना नाईलाजास्तव छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि हावडा येथील खासगी कंपन्यांकडून मत्स्यबिज खरेदी करावे लागते. यात पैसा आणि वेळ दोन्हींचा अपव्यय होत असून वाशिममध्ये शासकीय मत्स्यबिज केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

 

माशांच्या दर्जेदार उत्पादनासाठी साधारणत: जुलै महिन्यात धरणांमध्ये बिज टाकले जाणे आवश्यक असते. यंदा मात्र सर्वच धरणे कोरडी असल्याने ते अशक्य झाले. गतवर्षी देखील धरणांमध्ये उशिराने जलसाठा झाल्याने मत्स्योत्पादनात ३० टक्के घट झाली होती.
- सुरेश भारती
सहायक आयुक्त
मत्स्यव्यवसाय विभाग, वाशिम

Web Title: The dams in Washim is dry; Fishery business found in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.