ठळक मुद्देविद्यार्थ्यांची प्रगती तपासणार चार दिवस चालणार चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी घेतली जाणारी संकलित मूल्यमापन चाचणी बुधवार, ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेतली जाणार ही चाचणी ११ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या चाचण्यांची पूर्वतयारी झाली असून, प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी मंगळवारी दिली.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सदर उपक्रम फलदायी ठरत आहेत की नाही तसेच विद्यार्थ्यांची प्रगती तपासणीसाठी संकलित मुल्यमापन चाचणी सर्व शाळांमध्ये घेतली जाते. प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा  अर्थात इंग्रजी आणि विज्ञान या विषयांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी प्रथम भाषा विषय, ९ नोव्हेंबरला गणित, १० नोव्हेंबरला इयत्ता तिसरी ते आठवीचा इंग्रजीचा पेपर आणि ११ नोव्हेंबर रोजी इयत्ता सहावी ते आठवीचा विज्ञानचा पेपर होणार आहे. ही परीक्षा केवळ राज्य मंडळांच्या शाळांकरिता राहणार असून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश राहणार नाही. प्रत्येक शाळेला चाचणीचे पेपर रवाना करण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेने आपापल्या केंद्रांवरून पेपर प्राप्त झाले किंवा नाही याची खात्री करावी. आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन, अतिरिक्त प्रश्नपत्रिकांची मागणी शाळांनी अगोदरच कळवावी, अशा सूचनाही शाळांना दिलेल्या आहेत, अशी माहिती मानकर यांनी दिली. ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान होणाºया या चाचणीची पूर्वतयारी झाली असून, चाचणीसाठी शिक्षण विभाग व शाळा सज्ज आहेत, असे शिक्षणाधिकारी मानकर यांनी सांगितले.