वाशिम जिल्ह्यातील १३ बांधकाम कंत्राटदार, ४ संस्थांना टाकले काळ्या यादीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:51 PM2019-04-26T15:51:26+5:302019-04-26T15:52:14+5:30

विहित मुदतीत कामे पूर्ण न केल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील १३ कंत्राटदार व ४ संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली आहे.

13 construction contractors, 4 organizations in Washim district in blacklist! | वाशिम जिल्ह्यातील १३ बांधकाम कंत्राटदार, ४ संस्थांना टाकले काळ्या यादीत!

वाशिम जिल्ह्यातील १३ बांधकाम कंत्राटदार, ४ संस्थांना टाकले काळ्या यादीत!

Next

वाशिम : विहित मुदतीत कामे पूर्ण न केल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील १३ कंत्राटदार व ४ संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ग्रामीण भागातील रस्ते, इमारती, सभागृह बांधकाम आदी कामे करण्यात येतात. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीअंतर्गत १७ ठेकेदारांना देण्यात आलेली कामे रखडली होती. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करूनही सदरची कामे पूर्ण झाली नाहीत. या कामांमध्ये ग्रामीण भागातील रस्ते, बांधकाम, टीनशेडची कामे, वॉल कंपाऊंड, बांधकाम, मंदिर आणि दर्गाहचे सौंदर्यीकरण, अंगणवाडी दुरुस्ती आदी कामांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, कामांना विलंब होत असल्याने ग्रामीण जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला.

याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी घेतली. त्यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. आर. तापी आणि कार्यकारी अभियंता व्ही.बी. गहेरवार यांनी २० एप्रिल रोजी कारवाईचे आदेश काढले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे. काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांमध्ये एस.व्ही. डिवरे, एस.जे. गावंडे, एस.टी. बियाणी, इरफान अहमद खान, बी.एन. ठाकरे, पी.एस. माहुरकर, पी.के जाधव, विशाल बळी, पंकज मुळे, ज्ञानेश्वर बोरकर, गोरख भुतेकर, गोपाल देवळे आणि चेतन सरनाईक या १३ कंत्राटदाराचा समावेश आहे. याच बरोबर बहुजन हिताय बहुजन सुखाय संस्था, कुंडलीकेश्वर संस्था (एकांबा), मागासवर्गीय संस्था (गांगलवाडी) आणि जिजामाता संस्था या ४ संस्थांचा समावेश आहे. पुढील कालावधीत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत उपरोक्त कंत्राटदार व संस्थांना कोणत्याही प्रकारची कामे देण्यात येणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: 13 construction contractors, 4 organizations in Washim district in blacklist!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.