हे ‘अंडर करंट’ ठरवतील पालघर निवडणूकीतील विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:17 AM2018-05-28T06:17:58+5:302018-05-28T06:17:58+5:30

या लोकसभा मतदार संघातील प्रचार संपून उद्या मतदान होणार असले तरी या निवडणूकीतील काही अंडर करंट या मतदारसंघातील विजेता निश्चित करणार आहेत.

The winners of the Palghar elections that will decide this under-current | हे ‘अंडर करंट’ ठरवतील पालघर निवडणूकीतील विजेता

हे ‘अंडर करंट’ ठरवतील पालघर निवडणूकीतील विजेता

Next

- नंदकुमार टेणी
पालघर - या लोकसभा मतदार संघातील प्रचार संपून उद्या मतदान होणार असले तरी या निवडणूकीतील काही अंडर करंट या मतदारसंघातील विजेता निश्चित करणार आहेत. त्यामुळेच दृष्य प्रचार संपला तरी हे करंट मतदान संपेपर्यत त्यांचा प्रभाव टाकत राहणार आहेत.
या मतदारसंघात जवळपास १८ लाख मतदार आहेत. यापैैकी निम्मे मतदार वसई-विरार, नालासोपारा या परिसरात आहेत आणि हाच परिसर बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे. बहुजन विकास आघाडीने बळीराम जाधव यांची उमेदवारी जाहिर केली असली तरी त्यांचा प्रचार जीव ओतून केलेला नाही. आमचा बालेकिल्ला असल्याने आम्हाला प्रचाराचा गरज नाही, आम्ही सभा, रॅली घेण्याऐवजी प्रत्यक्ष संपर्कावर भर देणारा प्रचार केला असे सांगितले जात असले तरी खरी गोष्ट वेगळी आहे. ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी फार जोर लाऊ नका असे मुख्यमंत्र्यांनी बविआच्या श्रेष्ठींना साकडे घातले होते. त्यामुळे तिचा राजेंद्र गावितांना अप्रत्यक्ष पाठिंबा असल्यासारखे चित्र होते. परंतु वसईतील सभेत मुख्यमंत्र्यांनी बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांना कुत्रा म्हणून संबोधल्याने व ते आणि संपूर्ण संघटना खवळून उठली त्यामुळे बविआ आपली मते सेनेच्या पारडयात टाकणार अशी चर्चा सुरू झाली. पालघरच्या दौऱ्यावर असतांना उध्दव आणि हितेंद्र समोरासमोर आले असता त्यांच्यात गुफ्तगूही झाले त्यामुळेही या चर्चेला खतपाणी मिळाले. जर ही चर्चा खरी असेल तर वनगा यांचा विजय होण्याचीच शक्यता असेल. मुख्यमंत्र्यांचा कुत्रा राजेंद्र गावितांना भोवणार अशी कुजबुज भाजपामध्येही सुरू होती. २०१४ च्या निवडणूकीत राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या सभेत उचकून काढलेला बटाटे वडा जसा मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला तसाच मुख्यमंत्र्यांचा हा कुत्रा गावितांना त्रासदायक ठरेल अशीही चर्चा आहे.
पालघर जिल्हयाच्या सीमा प्रदेशातील जवळपास दिड लाख स्त्री-पुरूष गुजरातमध्ये कारखान्यात व उद्योगात कामासाठी जातात, पहाटे पाच ते सकाळी नऊ आणि रात्री पाच ते नऊ या काळात बसेस भरभरून हे कामगार रोज गुजरातला जातात आणि येतात. या परिसरात भाजपाचे के.सी. पटेल हे खासदार आहेत त्यांचे या कारखान्यांवर वर्चस्व आहे. भाजपाच्या उमेदवाराला एकगठ्ठा मते द्या नाहीतर कामावरून काढून टाकू अशा धमकीचे कार्ड त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत वापरले होते त्यामुळेच वनगा यांना विक्रमी मताधिक्य मिळाले होते. तेच धमकी कार्ड यावेळीही वापरले गेले व त्याला या वर्कफोर्सने तसाच प्रतिसाद दिला तर गावितांचा विजय सुलभ होऊ शकतो. ज्या पध्दतीने भाजपाने प्रत्येक सभेच्या व्यासपिठावर खासदार के.सी. पटेल यांना मानाचे स्थान दिले. ते पाहता हे कार्ड भाजपा वापरेल हे स्पष्ट होते. कारण त्यांचा या औद्योगिकक्षेत्रात प्रचंड प्रभाव आहे. त्याचाही मोठा परिणाम निकालावर होईल.
मनातून नाराज असलेला सवरा, धनारे, कठोळे गट त्याची ताकद गावितांच्या पाठीशी किती आणि कशी उभी करतो हा मुद्दाही महत्वाचा आहे. या गटाला या निवडणुकीत प्रारंभापासूनच तुच्छ लेखले गेले. त्यामुळे तो जीव ओतणाºया प्रचारापासून दूरच राहिला. सवरांचा मुलगा हेमंत जो अर्र्थाेपेडीक सर्जन आहे. त्याला या पोटनिवडणूकीची उमेदवारी मिळावी अशी सवरा आणि त्यांच्या दुकलीची इच्छा होती परंतु ते घडून आले नाही. उलट ते ज्या गावितांना कट्टर विरोधक मानत होते त्यांचा प्रचार करण्याची आफत सवरांवर आली. प्रचारातही या त्रिकुटाला फारसे स्थान नव्हते त्यामुळे त्याने जर त्याचा इंगा दाखविला तर गावितांच्या विजयाला स्वपक्षातूनच अपशकुन होऊ शकतो.


आदिवासी मतदार कशाला महत्व देणार? समाजबांधवाला की भाऊंच्या आदेशाला

विवेक पंडितांची श्रमजीवी भाजपाच्या बाजूने उभी आहे असे दिसले. परंतु संघटनेत आदिवासी मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे ते आपला असलेल्या श्रीनिवासच्या पारडयात मत टाकतील की विवेक भाऊंच्या आदेशाला मानतील यावरही बरेच काही अवलंबून असेल. या मतदारसंघात ९० टक्के मतदार आदिवासी आणि अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना इतकी वर्षे वनगा म्हणजे कमळ एवढेच माहिती आहे. तर शिवसेनेने लोकसभेची निवडणूक यापूर्वी कधी लढवलीच नसल्याने सेनेचा धनुष्यबाण व त्यावर वनगा हे निवडणूक लढवित आहेत. हे या समाजाला कळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आपले निवडणूक चिन्ह आणि श्रीनिवास या दोन्ही गोष्टी मतदारांच्या गळी कशा उतरवायच्या हा प्रश्न शिवसेनेसमोर आहे. सगळयात शेवटी प्रभावी ठरणारा मनी फॅक्टर किती प्रभावी ठरतो. भाजपने ज्या प्रचंड प्रमाणात या निवडणुकीच्या प्रचारात पैैसा ओतला तसाच तो कत्तल की रात समजल्या जाणा-या काळामध्ये वापरला तर त्याचाही परिणाम मोठया प्रमाणात घडून येऊ शकतो. तसेच बाहेरगावी गेलेले मतदारही सगळ्याच पक्षांची डोकेदुखी ठरू शकते.

Web Title: The winners of the Palghar elections that will decide this under-current

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.