पालघरमध्ये वाढलेल्या मताचा फायदा नक्की कोणाला होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:49 AM2019-05-08T00:49:50+5:302019-05-08T00:50:23+5:30

पालघरमधील मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने या वाढीव मतांचा फायदा नक्की कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Who will benefit from the increased vote of Palghar? | पालघरमध्ये वाढलेल्या मताचा फायदा नक्की कोणाला होणार?

पालघरमध्ये वाढलेल्या मताचा फायदा नक्की कोणाला होणार?

Next

नालासोपारा - एप्रिल महिन्याच्या कडक तापलेल्या उन्हात, आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये २९ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील पालघरचीनिवडणूक पार पडली असून १२ उमेदवारांच्या लढतीमध्ये बविआचे बळीराम जाधव आणि शिवसेनेचे राजेंद्र गावित यांच्यातच मुख्य लढत पहायला मिळाली. पालघरमधील मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने या वाढीव मतांचा फायदा नक्की कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात झालेले मतदान हे बविआ आणि महाआघाडीला झाल्याचे वाटते पण विक्र मगड, पालघर आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेना आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.

पालघर लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठींबा दिल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी मेहनत घेतल्याने मतदारांनी बविआच्या पारड्यात मते टाकली आहेत. तर दुसरीकडे श्रमजीवी संघटनेने महायुतीला पाठींबा देऊन सेनेच्या उमेदवाराला प्रामाणिकपणे मदत केल्याचे चित्र दिसून आले.

३ वेळा झालेले मतदान (२०१४ ते २०१९)...
२०१४ साली ९,९२,२८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६२.९० टक्के २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीत ८,६९,९८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ५३.२२ टक्के मतदान झाले.

आमचाच विजय , सोशल मीडियावर रोज वॉर
२९ एप्रिलला मतदान झाल्यापासूनच सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉट्सअ‍ॅप, ट्विटर यांच्यावर पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल असा वॉर आजपर्यंत सुरू आहे. थोड्याफार मतांच्या फरकाने का होईना पण आमचा उमेदवार निवडून येईल हे दाखवण्यासाठी आपआपल्या मतदानाची बेरीज लावून भविष्यवाणी करण्यासाठीही काही जण मागे पुढे पहात नाही.

वेध मतमोजणीचे : पालघरवासियांना आता २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवसाचे वेध लागले असून पालघरचा खासदार कोण होणार, अशी चर्चा गावागावातील नाक्यावर रंगू लागली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ लाख १ हजार २९८ इतके मतदान झाले आहे. जो उमेदवार ५ लाख ५० हजाराचा पल्ला गाठेल, तो सिकंदर ठरणार आहे. गेल्या लोकसभा पोटनिवडणूकीमध्ये ९ लाख मतदान झाले होते.

सहा विधानसभा मतदार संघातील मतदान
डहाणू विधानसभा मतदारसंघातील झालेले मतदान 1,81,252 (67.13 टक्के)
विक्र मगड विधानसभा मतदारसंघातील मतदान 1,83,584 (69.50 टक्के)
पालघर विधानसभा मतदारसंघातील मतदान 1,85,943 (68.57 टक्के)
बोईसर विधानसभा मतदारसंघातील मतदान 2,04,049 (68.49 टक्के)
नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदान 2,54,313 (52.16 टक्के)
वसई विधानसभा मतदारसंघातील मतदान 1,92,157 (65.24 टक्के)

 

Web Title: Who will benefit from the increased vote of Palghar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.