पालघर : पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, सफाई कामगार, गट प्रवर्तक, वाहन चालक अशा सुमारे १५ हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी उद्या (बुधवारी) विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी कामगार संघटनेचा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकणार आहे. श्रमजीवी संघटनेने कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आणला, त्यानंतर विवेक पंडित यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सरसकट सगळ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी न धरता त्यांच्याही अडचणी समजून घेण्याची भूमिका घेतली.
तळागाळात काम करणाऱ्या या घटकांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे वास्तव समोर आले असून अत्यंत तुटपुंज्या मानधनात हे काम करीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा आणि सुरक्षा नाहीत. आता पर्यंत हे घटक विखुरलेले होते. आपापल्या परीने लढत होते. मात्र सरकार दरबारी या घटकांची साधी दखल सुद्धा घेतली गेली नाही. आता सर्व घटकांच्या न्याय्य हक्काचा लढा उभारून श्रमजीवी कामगार संघटनेने या सर्वांना एकत्र आणले असून उद्या त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे (वार्ताहर)