नाल्यांवरील पार्किंगविरोधात कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:42 AM2019-05-19T00:42:59+5:302019-05-19T00:43:05+5:30

अपघात टाळण्यासाठी झाकणे लावा, पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या दिल्या सूचना

Take action against parking on the Nallah | नाल्यांवरील पार्किंगविरोधात कारवाई करा

नाल्यांवरील पार्किंगविरोधात कारवाई करा

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमधील नाल्यांवरील झाकणे चोरीला जाण्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबरोबरच झाकणे नसल्यास तेथे त्वरित नवीन झाकणे बसवून घेण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याची माहिती आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली. नाल्यांवर वाहने उभी करून मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मीरा-भार्इंदरमधील काँक्रिटच्या मोठ्या तसेच लहान बंदिस्त नाल्यांवर सर्रास दुचाकीपासून मोठ्या बस, डम्पर आदी वाहने बेकायदा उभी केली जातात. अवजड वाहने उभी केल्याने नाल्यावरील झाकणे तुटतात. इतकेच नव्हे तर काँक्रिटचा स्लॅबही वाकून तुटल्याचे प्रकार असल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. नाले, पदपथांवरच वाहने उभी केल्याने त्याआड गैरप्रकार चालतात. सेव्हन स्क्वेअर शाळेच्या परिसरातील नाल्यांचा तर अवजड वाहनांनी पार्किंगतळच केला आहे.


शहरातील बहुतांश नाले व गटारांची स्थिती अशी असताना महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून मात्र कारवाई केली जात नाही. स्थानिक नगरसेवकांकडूनही डोळेझाक केली जाते. नाले-गटारांवरील झाकणे तसेच स्लॅब पार्किंगमध्ये कमकुवत होऊन तुटत असल्याने नाले बनवण्याकामी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.


नाल्यांवरील चेंबरना लावलेली झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यात पालिकेशी संलग्न असणाºया मंडळींसह गर्दुल्ले, भंगारवालेही सहभागी असण्याची शक्यता आहे. याआधी पालिकेची झाकणे भंगारविक्रेत्यांकडे सापडली असता गुन्हा दाखल झाला होता.

धोकादायक चेंबर
लहान मुलांपासून मोठी माणसेच नव्हे तर उघड्या चेंबरमध्ये पडून म्हैस, गायही जखमी झाले आहेत. पण, चेंबरवर झाकणे नसल्याची पाहणी नियमितपणे होत नसल्याने सतत अपघात घडत असतात. नुकतीच भार्इंदर फाटक पूर्वेला भुयारी मार्गाबाहेर असलेल्या उघड्या चेंबरमध्ये १७ वर्षांची मुलगी पडून जखमी झाली होती. नाला खोल होता, पण सुदैवाने आत पाणी जास्त नसल्याने ती बचावली. आयुक्तांनी या घटनांची दखल घेत बांधकाम विभागासह स्वच्छता निरीक्षकांना नाले, गटारांवरील झाकणांची पाहणी करण्यास सांगितले आहे. झाकणे चोरीला गेली असतील, त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासह नवीन झाकणे बसवून घ्यावी.


पालिकेचे नुकसान भरून घ्यावे
नाले व गटारांवर पार्किंग करून पालिका मालमत्तेचे नुकसान करणाºया वाहनमालकांवर गुन्हा दाखल करून वाहनांवर कारवाई करा. पालिकेचे नुकसान भरून घ्यावे, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश बांधकाम विभागास दिल्याचे आयुक्त खतगावकर म्हणाले. तसेच झाकणे नसल्यास तेथे त्वरित नवीन झाकणे बसवून घेण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचीही माहिती आयुक्त बालाजी खतगावकर यांनी दिली.

Web Title: Take action against parking on the Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.