शशी करपे / वसई
बिल्डरांसोबत दारु पार्टी झाडल्यामुळे निलंबित केलेल्या काही ठेका अभियंत्यांची महापालिकेत पुन्हा उठबस सुुरु झाली आहे. चौकशीचा फार्स उरकून अभियंत्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली सुुरु असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्ससोबत महापालिकेच्या इंजिनिअर्सनी दारु पिऊन डान्स केल्याचा व्हिडिओ ५ फेब्रुवारीला व्हायरल झाला होता. महापालिकेतील स्वरुप खानोलकर या (मुख्य अभियंता अनधिकृत बांधकाम) ठेका इंजिनिअरच्या बर्थ डे पार्टीचे २४ जानेवारीला विरारच्या एका रिसॉर्टमध्ये आयोजन करण्यात आलें होतें.
पार्टीत नरेंद्र संखे, योगेश सावंत, रोशन भागात, केयूर पाटील, प्रवीण मुळीक, निनाद सावंत, कौस्तुभ तामोरे, निलेश मोरे, इंद्रजीत पाटील, परमजीत वर्तक, युवराज पाटील यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत मद्यधुंद नाच केल्याचे व्हिडिओत दिसत होते.
विशेष म्हणजे येथे फटाक्यांची आतषबाजी , डीजे होता , विदेशी मद्यही होते. वसईच्या समुद्रकिनारी रात्री उशीरापर्यंत ही जंगी पार्टी सुरु होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आयुक्त सतीश लोखंडे यांनी या बाराही ठेका अभियंत्यांना निलंबित केले होते.
मात्र, त्यानंतर काही दिवसातच यातील बरेचसे ठेका अभियंते पुन्हा महापालिकेच्या मुख्यालयात येऊन बसू लागले आहेत. विशेष म्हणजे आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये ते बसू लागले आहेत. काही जणांनी तर अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांच्या पुन्हा गाठीभेटी घेणेही सुरु केल्याचे दिसत आहे. निलंबित अभियंत्यांचा महापालिकेच्या मुख्यालयात खुलेआम सुुरु असलेला वावर अनेकांच्या भुवया उंचावत आहे.
महापालिकेत कायमस्वरूपी अधिकारी असतांना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार आयुक्त लोखंडे यांनी ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या खानोलकरकडे दिले होते. तो आयुक्त लोखंडे आणि उपायुक्त अजीज शेख यांच्या खास मर्जीतला असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे त्याला तक्रारी आल्याचे कारण दाखवून दोन वेळा कामावरून कमीही करण्यात आले होते. तो सहा महिन्यांपूर्वी पुन्हा कामावर हजर झाला होता. यावरून त्यांच्यावर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याची चर्चा सध्या महापालिका वर्तळात सुुरु आहे. त्यामुळे निलंबित केले गेले असले तरी चौकशीचा फार्स उरकून या सर्वांना क्लिन चीट देऊन पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली सुुरु असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे यातील बरेचसे अभियंते सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतील बड्या नेत्यांशी जवळीक साधून आहेत. उपायुक्त अजीज शेख आणि सहाय्यक आयुक्त सदानंद सुर्वे यांच्या मदतीने या निलंबितांना पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पार्टीत कोणताही बिल्डर नव्हता. तसेच खाजगी पार्टी असल्याने महापालिकेची प्रतिमा मलीन होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी भूमिका घेत अभियंत्यांनी महापालिकेतील काही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा कामावर रुजू कसे होता येईल यासाठी मोर्चेबांधणी सुुरु केली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात अभियंत्यांना क्लिन चिट देऊन महापालिकेत पुन्हा घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.