हितेन नाईक / पालघर
दांडी येथील निहार बोरसे या सहा वर्षीय बालकाला साप चावल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्यावर डॉक्टर गैरहजर असल्याने ‘डॉक्टरांची दांडी, नर्स चा उपचारास नकार’ असे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्या नंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.खंदारे यांनी डॉ. मोनिका स्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर स्थानिकांनी आरोग्यकेंद्राची स्थिती तात्काळ न बदलल्यास शुक्रवारी त्याला टाळे ठोकू असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
दांडी येथील निहार बोरसे या सहा वर्षीय बालकाला १४ फेब्रुवारी रोजी विषारी साप चावल्यानंतर दांडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र आरोग्य केंद्रात नियुक्त डॉ.शिरीष ठाकरे हे प्रशिक्षणाला गेल्यामुळे नव्हते तर डॉ. मोनिका स्वामी याही उपस्थित नव्हत्या. नर्सने केवळ प्रथमोपचार केले व पुढील उपचार करण्यास नकार दिल्याने पालकांनी तात्काळ निहारला तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर डॉ.शिंदे यांनी त्वरित त्याच्यावर उपचार केल्यामुळेच त्याचे प्राण वाचले. गैरव्यवहार आणि वादग्रस्त कारवाया साठी दांडी प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख बनत असून राजकीय वरदहस्त डॉक्टरावर असल्याने गरीब रु ग्णावर उपचार करण्यास हयगय केली जात असल्याचा आरोप रुग्णामधून होत आहे.
शासन परिपत्रकातील नियमानुसार दांडी आरोग्य केंद्रातील रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष म्हणून भाजपच्या रंजना संखे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच भाजपाचे जि.प. कृषी सभापती अशोक वडे, भावना विचारे तर सेनेचे तुलसीदास तामोरे यांची सह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षपदावरून सेना-बीजेपी मध्ये मोठा वाद आहे. ह्या वादा मध्ये गरीब रुग्णांचे मोठे नुकसान होत असून रुग्ण कल्याण समितीचे कुठलेही नियंत्रण दांडी केंद्र आणि डॉक्टरांवर नसल्याने अनेक गैरबाबी दांडी केंद्रात घडत आहेत. प्रसूती साठी आलेल्या महिलाना दुसऱ्या रुग्णालयात पाठवणे, सकाळी ११ वाजे पर्यंत आरोग्य केंद्रात न येणे आदी अनेक तक्रारी स्थानिकानी केल्या आहेत.