वसई : गावकरी संघटीत असतील तर गावात अनैतिक धंदे करणारे रिसॉर्ट कसे बंद होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण चुळणे गावक-यांनी वसईकरांपुढे ठेवले आहे. गावकºयांच्या दणक्याने पोलिसांनी गावात पुन्हा गस्त सुरु केली असून आता सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहे.
या गावात रिसॉर्टविरोधात जागृती सेवा संस्थेने आंदोलन सुरु केले होते. याची दखल घेऊन माणिकपूर पोलिसांनी रिसॉर्ट बंद केले. त्यानंतर संस्थेने पोलीस व जनता सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात बोलतांना पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी बंगल्यात रिसॉर्टच्या नावाखाली होत असलेल्या पार्ट्या गावकºयांच्या तक्रारीनंतर बंद करण्यात आल्या आहेत. तसेच गावात पोलीस गस्त सुरु करण्यात आली आहे. आता गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली. यावेळी फादर विल्सन रिबेलो, जागृती संघाचे अध्यक्ष राजेश घोन्सालवीस, जॅक गोम्स, जॉय डिमेलो यांच्यासह तीनशे गावकरी उपस्थित होते. गावातील तलावावर रात्री मद्यपी बसलेले असतात. त्यांचा उपद्रव गावकºयांना होतो. मोटार सायकली वेगाने चालवल्या जातात. तरुणांची गुंडगिरी वाढत चालली आहे. विकासकांनी भराव केल्याने गावात पूराचे पाणी घुसते. पाड्यावर व किराणा दुकानात गावठी दारु विक्री केली जाते. आदी तक्रारीही यावेळी करण्यात आल्या.