- हितेंन नाईक

पालघर : रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. तसा प्रयत्न कोणी केल्यास त्याच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा या संघटनेने दिल्याने दसºयाला जिल्ह्यात होणारे रावण दहनाचे कार्यक्रम अडचणीत सापडले असून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या कडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागणार आहे.
देशभर दसºयाला रावण आणि महिषासुर या दैत्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्याची प्रथा वर्षानुवर्षा पासून सुरू आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान, मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असतात. तत्कालीन उपपंतप्रधान अडवाणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पेटता बाण सोडून रावणाच्या प्रतिमेचे दहनही केलेले आहे. मात्र श्रमिक संघटनेने केलेल्या मागणीने एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले असून प्रशासनाला यातून मार्ग काढण्याची कसरत करावी लागणार आहे.
रावण, महिषासुर ह्या दोघांचे वैश्विक ज्ञान, राजकारण, समाजकारण, संस्कृती, कला आणि विद्येवरचे प्रभुत्व हे समाजा करीत अभिमानास्पद आहे. म्हणून आदिवासी समाजाचे ते वंदनीय राजे असल्याचा अभिमान आम्हाला असताना काही असामाजिक तत्त्वांनी काही कारणास्तव त्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने रंगविल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्हा आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या असून रावण दहनाच्या प्रथेचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही. त्यामुळे ह्या बाबत जिल्हाधिकाºयांनी न्यायालयाने केलेल्या सूचनांची पडताळणी करावी अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी पत्राद्वारे केली आहे. याउपरही जर कोणी दहनाचा प्रयत्न केल्यास संघटना त्याचा तीव्र निषेध करेल आणि जे आमच्या भावना दुखावतील त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत आणि १९६०च्या भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केले जातील असा इशारा देण्यात आला आहे.

दोन्ही लोकांना एकत्र बोलावून सण आनंदात साजरा करण्याचा दृष्टीने ह्यातून शांततामय मार्ग काढू.
- महेश सागर, तहसीलदार

कायदा व सुव्यवस्था कोणी बिघडवणार नाही ह्याकडे आपली जातीने लक्ष देऊ.
- किरण कबाडी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालघर