नोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 06:30 AM2018-11-11T06:30:49+5:302018-11-11T06:31:19+5:30

दीपक शहा, कार्तिक शहा : आजही ‘त्या’ आठवणीने हळहळतात सारे

Nirvana has not changed the world ... | नोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत...

नोटाबंदीने विस्कटलेले संसार सावरलेच नाहीत...

Next

धीरज परब 

मीरा रोड : भुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिन कॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले. शहा यांचे कुटुंब त्या आघातातून आजही सावरलेले नाही. छत्तीस वर्षांचे कार्तिक शहा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांच्याकडील जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांनी उपचाराविना तडफडत प्राण सोडले. सध्या त्यांचा मेव्हणा शहा चालवत असलेली शालेय विद्यार्थ्यांना सोडणारी स्कूल व्हॅन चालवून त्यांच्या पत्नी व दोन मुलांचा सांभाळ करीत आहे.

भार्इंदर पश्चिमेतील देवचंद नगरातील श्रीपालनगर येथील दीपक शहा यांचे घर गाठले. दीपक यांच्या पत्नी अश्विना तर धाकटी मुलगी दिशा या राजस्थानला नातलगांकडे गेल्याचे समजले. दिवाळीत शहा कुटुंब गेली दोन वर्षे घरी राहत नाही. त्यामुळे आजूबाजूची घरे दिव्यांची रोषणाई व कंदील यांनी उजळली असताना शहा यांचे घर काळोखात बुडून गेले होते. त्यांच्या काही शेजाऱ्यापाजाºयांकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, शहा हे मनमिळावू स्वभावाचे व शांत गृहस्थ होते. नोटाबंदी झाल्यानंतर ते त्रस्त होते. बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी किंवा पैसे काढण्याकरिता ते १६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता गेले. दोन ते अडीच तासांनंतर त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. दीपक हेच शहा कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. नुकतेच त्या वेळी त्यांच्या मोठ्या मुलीचे जैनाचे लग्न झाले होते. गेली २५ वर्षे हे कुटुंब तेथेच वास्तव्य करीत आहे. शहा कुटुंबाचा चरितार्थ वडिलांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच त्यांच्या मृत्यूपश्चात मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युईटीच्या पैशावर चालत असावा, असा अंदाज शेजाºयांनी व्यक्त केला. शहा यांचा मृत्यू नोटाबंदीमुळे झाला, अशी नोंद करून घ्यायलाही पोलिसांनी शेवटपर्यंत नकार दिला. त्यांच्या कुटुंबाला सरकारने मदत वगैरे देणे तर दूरच राहिले. शहा यांच्यासारखी शेकडो कुटुंबे नोटाबंदीच्या निर्णयानंतर कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने पोरकी झाली. मात्र सरकारने कुणाचीही जबाबदारी घेतली नाही. उलट नोटाबंदी हीच कशी हितावह आहे, याची लंबीचौडी भाषणे दिली, याबद्दल शहा यांच्या शेजाºयांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
भार्इंदर पश्चिमेतील शिवसेना गल्लीतील हमीरमल कुटीरमध्ये राहणारे कार्तिक शहा हे घराजवळील जिन्यापाशी कोसळले. शेजाºयांनी त्यांना तातडीने डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी आपल्या ७०० रुपयांच्या फीकरिता जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे कार्तिक यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचे निधन झाले. कार्तिक हे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी व्हॅन चालवून कुटुंबाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या पश्चात पत्नी डिंपल, एक १४ वर्षांची मुलगी व १० वर्षांचा पुत्र वर्धमान असा परिवार आहे. कार्तिक यांचे मेव्हणे माहिपाल पटेल यांनी आता या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. कार्तिक यांची स्कूल व्हॅन चालवून ते या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कार्तिक यांच्यावर उपचार करण्यास नकार देणाºया डॉक्टरवर कारवाई करण्याची शहा कुटुंबाची मागणी अदखलपात्र राहिली. नोटाबंदी झालेली नसती तर कार्तिक यांच्यावर वेळीच उपचार झाले असते व कदाचित ते वाचले असते, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. नोटाबंदीमुळे अनेक कुटुंबाची अपरिमित हानी झाली.

नोटाबंदीचा त्रास लोकप्रतिनिधी व बड्या नेत्यांना झाल्याचे दिसत नाही. रांगा लावून मरण पावली ती सामान्य माणसंच. नोकºया गेल्या, रोजगार बुडाला, महागाई वाढली. नोटाबंदीचा फायदा झालाच असेल तर तो बडे नेते, लोकप्रतिनिधी आणि बडे उद्योजक यांनाच झाला आहे. भ्रष्टाचार कमी झालेला नाही. सामान्य लोकांच्या यातना काही कमी झालेल्या नाहीत.
- दीपिका अ. पाटील, तरु णी

दोन वर्षांपूर्वी देशात अचानक नोटाबंदी लागू करण्यात आली. माझ्यासारख्या रिक्षाचालकाला मनातून वाटले की, चला देशातील काळा पैसा बाहेर येईल. श्रीमंतांची गोची करणारा सरकारचा निर्णय चांगला आहे. मात्र दोनच दिवसांत हा निर्णय किती घातक आहे, याची प्रचिती आली. दोन वर्षे उलटून गेली तरी त्याच्या झळा नागरिकांना बसत आहेत. विशेषकरून आमच्यासारख्या रिक्षाचालकांना एखाद्या प्रवाशाने दोन हजार रुपयांची नोट दिली की, सुट्टे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न पडतो. अन्य नोटाही बाजारात हळूहळू आल्या. हा निर्णय चुकीचा होता. - नरेंद्र घुगे, रिक्षाचालक

नोटाबंदीचा फटका केवळ सामान्यांना बसला नाही. तर उद्योजकांनाही बसला. अनेक उद्योजकांनी त्या वेळी प्रतिक्रिया दिल्या होत्या की, नोटाबंदीमुळे धंदा घाट्यात आला. जास्त फटका सामान्यांनी सहन केला असेल तर त्याच्या पाठोपाठ उद्योजकांनाही बसला. नोटाबंदीमुळे पगार थकले होते. अनेक उद्योजकांची नोटाबंदीत घसरलेली गाडी अद्याप रुळावर आलेली नाही. सगळ्याच अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. भारत कॅशलेस न होता बेसलेस झाला तेही अर्थकारणाच्या बाबतीत. याच्या झळा भाजपाला २०१९ च्या निवडणुकीत बसू शकतात. -स्वप्निल पवार, इंजिनीअर

Web Title: Nirvana has not changed the world ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.