विरार : नालासोपाऱ्यातील धानीव बाग येथे झालेल्या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी वालीव पोलिसांनी तिच्या प्रियकराला त्याच्या तीन साथीदारासह उत्तरप्रदेशातून अटक केली. तिचे अन्य कुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्यानेच त्याने तिची हत्या केली होती.
२९ डिसेंबर २०१७ रोजी धानीव बाग येथील एका चाळीतील खोलीत सरोज जयस्वाल हिचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता. त्या आधी ती तीन दिवस बेपत्ता होती. तिचा पती वीरेंद्र जयस्वाल यांने ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिचा मृतदेह हाती येताच त्याने दिलेल्या माहितीवरून अजीम खान, सोनू खान, तालीब खान आणि नजीम खान यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक माने, पो.ह.संजय नवले, पो. ना. शिवाजी पाटील, गोविंंद केंद्रे यांनी उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथून चारही आरोपींना अटक केली.
विवाहित सरोजचे अजीम खान (२३) या तरुणाशी अनैतिक संबंध होते. तिचे अन्य कुणाशी संबंध असल्याच्या संशयामुळे भांडणे होत होती. सततच्या वादाला कंटाळून तिने अजीमला दूर केले होते. याचा राग मनात असलेल्या अजीमने तिला आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्याच रात्री तिचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर आपल्या साथीदारांसह तो गावी पळून गेला होता. (वार्ताहर)