अनैतिक व्यवसायाचे केंद्र अशी मीरा-भाईंदरची नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:23 AM2019-06-24T00:23:41+5:302019-06-24T00:23:48+5:30

मीरा-भार्इंदर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. पण, ‘पैसा बोलता है’ असे म्हणत शहरातील बारकडे कानाडोळा करायचा, असा पवित्रा दिसतो.

Mira-Bhayander's new identity as the center of immoral business | अनैतिक व्यवसायाचे केंद्र अशी मीरा-भाईंदरची नवी ओळख

अनैतिक व्यवसायाचे केंद्र अशी मीरा-भाईंदरची नवी ओळख

Next

- धीरज परब 

मीरा-भार्इंदर    शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. पण, ‘पैसा बोलता है’ असे म्हणत शहरातील बारकडे कानाडोळा करायचा, असा पवित्रा दिसतो. केवळ पोलीस नव्हे तर पालिका, राजकीय मंडळी सगळ्यांचे खिसे गरम होत असल्यामुळे कारवाईबाबत कुणीही बोलत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

वंडीहून आलेल्या पोलिसांनी मीरा-भार्इंदरमधील आॅर्केस्ट्रा बारवर छापा घालून स्थानिक पोलिसांचीच नव्हे तर लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. छापे घालून, गुन्हे दाखल करून आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणारे अनैतिक व्यवसाय काही थांबलेले नाहीत. दुसरीकडे लॉजमधून चालणाऱ्या अनैतिक व्यवसायाकडे कानाडोळा का केला जात आहे, याचेही आश्चर्य आहेच.

तब्बल शंभरपेक्षा जास्त लॉज आणि ५० च्या घरात असलेले आॅर्केस्ट्रा बार शहरात कुणाच्या सुविधेसाठी आहेत, याचे उत्तर लोकप्रतिनिधींपासून महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासन आणि शासनानेही दिले पाहिजे. मुंबई-ठाण्यातूनच नव्हे तर अगदी गुजरात, राजस्थान व अन्य राज्यांतील आंबटशौकीन शहरातील आॅर्केस्ट्रा बार व लॉजमध्ये येतात. याचा अर्थ शहर अनैतिक व्यवसायाचे केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे, हेच त्यातून सूचित होते.

शहरातील आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणाºया अश्लील नाचगाण्यांसह बार आणि लॉजमधून चालणारे अनैतिक व्यवसाय मोडून काढण्यात लोकप्रतिनिधींसह पोलीस, महापालिकांपासून सरकारलाही स्वारस्य नाही. हा व्यवसाय वाईट असला तरी बक्कळ पैसा मात्र मिळत असल्याने या आॅर्केस्ट्रा बार आणि लॉजविरोधात ठोस कारवाईच केली जात नाही. बार-लॉजच्या अनधिकृत बांधकामांना विविध मार्गाने संरक्षण तर दिले जात आहेच, पण ते अगदी ग्रामपंचायत काळाचे सांगून अधिकृत ठरवण्याचे भन्नाट प्रकार या महापालिकेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने चालवले आहेत. चुकीच्या पद्धतीने लॉज, मद्य, अग्निशमन, खाद्य, सादरीकरण आदी विविध परवाने सहज दिले जातात. बहुतांश अटींचे उल्लंघन होत असूनही कानाडोळा केला जातो.

काही बारप्रकरणी तर पोलिसांनी परवाने न देण्याच्या शिफारशी करूनही अगदी मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील गृह विभाग आॅर्केस्ट्रा बारना परवाने देण्याचा आदेश देतो, यावरून धागेदोरे कुठपर्यंत गुंतलेले आहेत, हेच दिसून येते. त्यातच कहर म्हणजे आॅर्केस्ट्रा बार आणि लॉजचालकांनाच नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी केलेले असल्याने अनैतिक व्यवसायामुळे शहराच्या कपाळी लागलेला बदनामीचा बट्टा पुसणार तरी कसा?

मीरा-भार्इंदर शहरे ही काही पर्यटनाचे वा मोठी उद्योगक्षेत्रे असलेली शहरे नाही. तरीही, शहरांत शंभरपेक्षा जास्त लॉज आहेत, तर ५० पेक्षा जास्त आॅर्केस्ट्रा बार आहेत. बहुतांश लॉज व बार हे अनधिकृत आहेत. त्यातही आॅर्केस्ट्रा बारना लागून बरेच लॉज आहेत. अगदी निवासी इमारतीत व नागरी वस्तीत आॅर्केस्ट्रा बार आणि लॉज थाटले आहेत. वाहने उभी करण्यासाठी जागा नाही, मंजूर नियमावलीप्रमाणे व नकाशानुसार बांधकामे नाहीत, अग्निशमन यंत्रणा व सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत. अनेक त्रुटी असतानाही जिल्हा प्रशासनापासून महापालिका, सरकार आदी आॅर्केस्ट्रा बार व लॉजचे परवाने देत सुटले आहेत. आॅर्केस्ट्रा बार आणि लॉजवर वेश्या व्यवसाय चालवल्यासह बेकायदा अश्लील नृत्य, चाळे आदी अनेक प्रकरणी दाखल गुन्हे आणि पोलिसांच्या अहवालास परवाना देणाºया सरकारी यंत्रणांकडून केराची टोपली दाखवली जाते. महापालिका तर अशा लॉजवर सरसकट कारवाई करत नाही. अर्थपूर्ण आणि राजकीय वजन ठेवणाऱ्यांना मोकळीक दिली जाते. लॉजमधून सर्रास अनैतिक व्यवसायासाठी तरुणींचा पुरवठा केला जातो. परंतु, लॉजविरोधात पोलिसांची कारवाई फारच क्वचित केली जाते.

आॅर्केस्ट्रा बारमध्ये चार गायिका ठेवण्याची मुभा असली, तरी प्रत्यक्षात गायिका ठेवल्याच जात नाहीत. बारबालाच तोकड्या कपड्यांमध्ये गाणे म्हणण्याचे नाटक करत असतात. गाणे सीडी प्लेअरवर वाजवले जाते. स्टेजजवळ रेलिंग नसते. मोठ्या संख्येने बारबाला अश्लील हावभाव करत कायद्याने बंदी असूनही नाचत असतात.
बारबालेवर पैसे उडवण्यास बंदी असतानाही सर्रास पैसे उधळले जातात. आॅर्केस्ट्रा बारच्या आड बेकायदा नाच चालतोच, पण अनैतिक व्यवसायासाठी या बारबालांचे सौदे चालण्याचे प्रकारही नवीन नाही. उत्पादन शुल्क विभाग तर केवळ महिन्याचा पगार आणि वरकमाई पुरताच आहे का, असा प्रश्न पडतो.
पोलिसांसह महापालिका, जिल्हा प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग, लोकप्रतिनिधी व प्रमुख नेत्यांसह सरकारही लॉज व आर्केस्ट्रा बारचालक हाताशी धरून ठेवतात. त्यामुळेच अनेक नियम - कायदे आणि अटींचे सर्रास उल्लंघन करून चालणाºया लॉज व बारवर थातूरमातूर कारवाई केली जाते. आॅर्केस्ट्रा बारवरील छाप्याचे गुन्हे दाखल करताना स्थानिक पोलीस फुटकळ कलमे लावतात. मध्यंतरी, पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्हा प्रशासनास पत्र देऊन गुन्हे दाखल असलेल्या आॅर्के स्ट्रा बारना सादरीकरण परवाने देऊ नये, अशी भूमिका घेतली होती.
जिल्हा प्रशासनानेही सादरीकरण परवाने न दिल्याने जवळपास सर्वच आॅर्के स्ट्रा बार बंद झाले होते. परंतु, या बारवाल्यांनी शहरातील एका राजकीय नेत्यास हाताशी धरून थेट मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागाकडून आदेश आणून सादरीकरण परवाने मिळवले. यावरून अनैतिक व्यवसाय करणारे हे बार व लॉजचालक राजकारण्यांनाही किती फायद्याचे आहेत, हेच स्पष्ट होते. या बार-लॉज संघटनेचे पदाधिकारीही नगरसेवक आणि राजकीय पक्षाचेही पदाधिकारी आहेत.
भार्इंदर पूर्वेला लॉज आणि आॅर्केस्ट्रा बारमालक असलेल्या व्यक्तीस गेल्यावेळी भाजपने उमेदवारी दिली आणि तो नगरसेवक म्हणून निवडूनही आला. त्याच्यावर वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी पीटाचा गुन्हा असूनही उमेदवारी दिली गेली. आता त्याची पत्नी भाजपची नगरसेविका आहे. या नगरसेवकाचे लॉज बेकायदा व त्यात वेश्या व्यवसाय चालत असूनही पालिकेने आजही जमीनदोस्त केलेला नाही. उलट, लॉजवर कारवाई करायला घेतली, त्याच दिवशी महापौरांपासून पदाधिकाºयांनी दालनबंद आंदोलन चालवले.
भार्इंदर पूर्वेच्या आणखी एका आॅर्केस्ट्रा बारमालकावर वेश्या व्यवसायप्रकरणी पीटाचे गुन्हे दाखल आहेत. त्यालाही भाजपने उमेदवारी दिली आणि तो नगरसेवक म्हणून निवडून आला. शहरात अनेक बार आणि लॉजशी संबंधित असलेल्या आणि पीटाचा गुन्हा दाखल असलेल्यालाही भाजपने उमेदवारी देऊन नगरसेवक केलेच, पण सभापतीपदही दिले. आणखी काही लॉज व बारचालक हे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत.

Web Title: Mira-Bhayander's new identity as the center of immoral business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.