राहुल वाडेकर
विक्रमगड : पुणे येथील भोसरी येथे पार पडलेल्या प्रेरणा कला गौरव पुरस्कार सोहळ्यात येथील युवा नर्तकांनी क्रोम फास्ट रोबोटीक्स या आधुनिक नृत्यातील आपले कौशल्य दाखवून पुणेकरांची मने जिंकून घेतली. विशेष म्हणजे त्यांचे हे नृत्य एका स्थानिक सोहळ्यात पाहिल्यानंतर एका अभिनेत्रीने त्यांना या सोहळ्यात त्यांची कला सादर करण्याची संधी दिली होती. हा सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये पार पडला.
यावेळी अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, लागीर झाल जी फेम राहुल मगदुत यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले़ तसेच हिंद केसरी अमोल बुचडे यांना क्रीडा गौरव, शरीरसौष्ठवपटू महेंद्र चव्हाण यांना क्रीडा गौरव, स्वानंदी ट्रस्टचे संस्थापक रविंद्र घळसासी यांना समाज भूषण, वासुलीचे आदर्श उपसरपंच सुरेश पिंगळे, यांना समाज भूषण व मराठी चित्रपटाचे प्रसिध्दी प्रमुख रमेश शेट्टी यांना कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी या दिग्गजाचे मनोरंजन करण्याकरीता विक्रमगड तालुक्यातील माण गावातील कलाकांराना आमंत्रित करण्यात आले होते. एवढया मोठया स्टेजवर कला सादर करण्याचा अनुभव नसतांनाही त्यांनी केलेले अप्रतिम सादरीकरण पाहून प्रेक्षकांची तसेच नामवंत सिनेकलाकारांची व मान्यवरांची मने भारावून गेली.
यावेळी अभिनेत्री उर्षा उसगावकर यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला. याकार्यक्रमाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नृत्य दिग्दर्शक रेवती निकम (पिंपरी चिंचवड जज रेफ्री) यांचे मोलाचे सहकार्य या ग्रामीण भागातील कलाकारांना लाभले़ तसेच या कार्यक्रमात शाळा व रायझिंग स्टार अ‍ॅकॅडमीचाही सहभाग होता़ त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.