माकुणसार खाडी पूल सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:46 PM2019-06-17T22:46:46+5:302019-06-17T22:47:08+5:30

दुरूस्तीचे काम वेगात; वाहतुकीस आहे ठणठणीत, तक्रारीत तथ्य नाही

Maikunasar Bay Pool Safe | माकुणसार खाडी पूल सुरक्षित

माकुणसार खाडी पूल सुरक्षित

Next

पालघर : सफाळे-केळवे, माहिम, पालघर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्गावरील माकुणसार खाडीवरील पूल अतिशय धोकादायक स्थितीत असल्याबाबत तक्रारी होत्या. याबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न विचारण्यात आल्यानंतर हा पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचे व दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक बढे यांनी लोकमतला सांगितले.

पालघर तालुक्यातील झाई-बोर्डी -रेवस-रेड्डी-सातर्डे या प्रमुख राज्यमार्ग क्र मांक ४ दर्जाच्या रस्त्यावर ७९/१०० किमीमध्ये माकुणसार खाडीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे या पुलाचे बांधकाम सन १९६८ साली करण्यात आलेले आहे. पुलाची रचना ही प्रत्येकी वीस मीटरचे ७ गाळे अशी असून पुलाची एकूण लांबी १४० मीटर इतकी आहे. या पुलाची दुरवस्था झाल्याच्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्यानंतर विधानपरिषदेत सेनेचे आमदार रवींद्र फाटक आणि प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) मुंबई या संस्थेमार्फत पूलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट) सन २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे. या लेखा परीक्षण अहवालानुसार या पुलाचे दुरुस्तीचे कामास गट ‘क’ अंतर्गत रुपये ३ कोटी ५० लक्ष इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त असून सद्यस्थितीत पुलाच्या पायाच्या व स्तंभाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीत असल्याची माहिती उपविभागीय अभियंता महेंद्र किणी यांनी लोकमतला दिली.

या पुलाच्या सुपर स्ट्रक्चरची पाहणी पुनश्च अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे व व्हीजेटीआय मुंबई संस्थेच्या प्राध्यापकांनी दिनांक २० एप्रिलला २०१९ रोजी प्रत्यक्ष केली आहे. व्हीजेटीआय संस्थेमार्फत प्राप्त पाहणी अहवालानुसार (पुलाच्या स्तंभाचे काम दुरुस्ती करून) पुलाच्या वरील भागाचे (सुपरस्ट्रक्चर)चे नव्याने बांधकाम करणे आवश्यक असून सुपरस्ट्रक्चरच्या नव्याने बांधकामासाठी साधारणपणे ३ कोटी रुपये एवढा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती तारांकित प्रश्नाला उत्तर देताना देण्यात आली आहे.

हे काम येत्या जून २०१९ च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघरकडून प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे वृत्त पसरविणे चुकीचे असून व्हीजेटीआयच्या तज्ज्ञ समितीने पाहणी करून हा पूल वाहतुकीस धोकादायक नसल्याचा अहवाल दिला आहे.

प्रवासी संघटनेची मागणी
सप्टेंबर महिन्यात या पुलाच्या बांधकामातील शिगा बाहेर येत अनेक ठिकाणी तडे गेल्याने पुलाला भासणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करु न पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे, अशी विनंती वजा मागणी करण्यात आली होती.

Web Title: Maikunasar Bay Pool Safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.