Jawahar 3.2 The push of the Richter Scale, the villager left the house all night | जव्हारला ३.२ रिश्टर स्केलचा धक्का, ग्रामस्थ रात्रभर घराबाहेर

- हुसेन मेमन
जव्हार : तालुक्याला सोमवारी मध्यरात्री २:२०च्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्का बसला. हा धक्का ३.२ रिश्टर स्केल एवढा नोंदविला गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
दरम्यान, यात कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी गावकºयांनी रात्र घराबाहेर काढली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खाली उत्तरेला १९.८ डीग्री तर पूर्वेला ७३.१ डीग्री
आहे.
वाळवंडा, काशिवली, डेगचीमेट परिसरात भूकंपाचा परिणाम झाला असून येथील आदिवासी भयभीत झालेले आहेत.
वळवंडापैकी सडकवाडी यथील रहिवासी रमेश वैजल यांच्या घराचा खांब एका बाजूने बाहेर निघाला असून त्या घराला लाकडी मेहेडचा आधार देण्यात आला आहे. ईश्वर चौधरी यांच्या वाडीतील बोरिंगचा भाग पूर्णपणे खचून मोठा खड्डा पडला आहे; तसेच अनेक घरांना छोटे-मोठे तडे गेले आहेत.
सुरेश रघुनाथ चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये भूगर्भांतर्गत हालचाली व सौम्य धक्के जाणवत आहेत. आम्ही फक्त जेवणासाठी घरात जातो आणि मुलाबाळांसह बाहेर पडतो. रात्रीच्या वेळी भर थंडीमध्ये छोटे-मोठे तंबू टाकून झोपतो.
दरम्यान, महसूल प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत.