इस्रायली विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 10:51 AM2018-09-04T10:51:11+5:302018-09-04T10:54:42+5:30

इस्रायलच्या व्यवस्थापन कॉलेजमधील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (El Al) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले 17-29 ऑगस्ट असे दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते.

Israeli students give Palghar school face lift | इस्रायली विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट

इस्रायली विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट

Next

वाडा - इस्रायलच्या व्यवस्थापन कॉलेजमधील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (El Al) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले 17-29 ऑगस्ट असे दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. या विद्यार्थ्यांनी इस्रायलमध्ये देणग्या गोळा करून वाड्यातील मुलांसाठी दोन टन सामान गोळा केले होते. त्यात शैक्षणिक साहित्य, पुस्तकं, कपडे आणि खेळण्यांचा समावेश होता. दोन आठवड्याच्या आपल्या वास्तव्यात इस्रायली विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी केली असून शाळेसमोरच्या अंगणात मुलांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक खेळांची निर्मिती केली आहे. याशिवाय मुलांसाठी इंग्रजी, गणित, आरोग्य आणि पर्यावरण या विषयांचे धडे घेण्यात आले.

गेल्या वर्षी भारत इस्रायल संबंधांना २५ वर्ष पूर्ण झाली. गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला तर बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताला भेट दिली. भारत इस्रायल यांच्यात शेती, पाणी, सायबर सुरक्षा, स्मार्ट शहरे तसेच शिक्षण आशा अनेक क्षेत्रात सहकार्य वाढत आहे. याबरोबरच दोन्ही देशांच्या लोकांमध्ये आणि एकमेकांच्या संस्थामधील सांस्कृतिक बंध अधिकाधिक मजबूत होत आहेत. इस्रायली तरुण-तरुणी सक्तीच्या लष्करी सेवेनंतर जगभर प्रवास करतात. त्यातील सुमारे 40,000 भारताला भेट देतात. त्यांनी काही दिवस आपण भेट देत असलेल्या देशांमध्ये सामाजिक कामात सहभाग घेतला तर त्याचा इस्रायलच्या परराष्ट्र संबंधांना फायदा होऊ शकेल या हेतूने 8 वर्षांपूर्वी या प्रकल्पाची सुरुवात झाली. यापूर्वी केनिया, फिलिपाईन्स, युगांडा इ. देशात, तसेच येथे इस्रायली मुलांनी काम केले असून भारतात येण्याची त्यांची ही दुसरी खेप होती.

इस्रायलच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाड्याला येण्यासाठी स्वतःच्या खिशातून सुमारे लाखभर रुपये खर्च केले. या कार्यक्रमास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी नावं नोंदवली होती. पण नियोजनाच्या दृष्टीने केवळ 40 विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात आला. या उपक्रमाची तयारी गेले 10 महिने चालू होती. व्यवस्थापन कॉलेजचे प्रतिनिधी लिओर टुइल आणि अलोन मिझराखी यांनी एप्रिल 2018 मध्ये वाड्याला भेट दिली. मुलांची पार्श्वभूमी आणि शैक्षणिक गरजा समजावून घेतल्या. गेले 3 महिने इस्रायली विद्यार्थी काय आणि कसे शिकवायचे याची तयारी केली होती. या प्रयत्नांची दखल घेत इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यासाठी सुमारे 10  लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला.

त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्य दूत याकोव फिंकलश्टाईन यांनी, दूतावासातील काँसुल गलीत लारोश फलाह आणि राजकीय संबंध आणि विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर यांच्यासह वाड्याला भेट दिली.

या निमित्ताने केलेल्या निरोप समारंभास महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णु सवरा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ऐनशेत गावातील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाने झाली. या उपक्रमास मोलाचे सहकार्य करणाऱ्या ३६० फाउंडेशनचे रोहन ठाकरे यांच्या घरी  याकोव फिंकलश्टाईन आणि विष्णु सवरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनतर वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेस भेट देऊन इस्रायली विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाची पाहणी करण्यात आली.

आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी इस्रायलच्या विद्यार्थ्यांनी राज्यभरातील शाळांची पाहाणी करून वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची निवड केली, हा वाड्याचा गौरव असल्याचे सांगितले. या वेळी इस्रायली विद्यार्थी लिओर टुइल याने चक्क मराठीत भाषण केले. 

इस्रायलच्या विद्यार्थ्यांना आपल्या गावातील शाळेसाठी काम करताना पाहून वाड्यातील स्थानिक रहिवासी आणि सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. पी.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कामात हातभार लावला, कोणी रंग आणून दिला तर कोणी शैक्षणिक साहित्य पुरवले. यामुळेच अनेकदा 100 हून अधिक लोक शाळेसाठी काम करत होते. हे या प्रकल्पाचे आठवे वर्ष असून पण स्थानिक लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच सहभागी होताना पाहिल्याची कबुली अलोन मिझराखी यांनी दिली. दरम्यान, सामान्य नागरिक दोन देशांतील संबंध सुधारण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे या प्रकल्पातून दिसून आले आहे.

Web Title: Israeli students give Palghar school face lift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.