पतीचा खून, प्रियकर, प्रेयसी दोषी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:03 PM2018-12-12T23:03:24+5:302018-12-12T23:03:53+5:30

शिक्षा ठोठावणार शनिवारी; जिल्ह्यात गाजलेल्या खटल्याची सुनावणी झाली तत्परतेने

Husband's blood, lover, girlfriend guilty! | पतीचा खून, प्रियकर, प्रेयसी दोषी!

पतीचा खून, प्रियकर, प्रेयसी दोषी!

Next

- हितेन नाईक

पालघर : प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या समीर पिंपळे (रा.पालघर) या आपल्या पतीचा प्रियकराच्या साथीने खून केल्याबद्दल प्रियकर व प्रेयसी या दोघांना पालघरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून १५ डिसेंबर रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

येथे राहणारा समीर हरेश्वर पिंपळे हा शिक्षक आपली पत्नी समिधा व मुलांसह राहत होता. ९ जुलै २०१५ रोजी तो आपल्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक निलेश मार्इंनकर यांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला मारहाण केल्याच्या व खरचटल्याच्या खूणा असून तोंडातून रक्त येत होते. त्यामुळे त्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची तक्रार त्याचे वडील हरेश्वर यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली होती. त्याच्या पत्नीचे अन्य एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याने दोघांनी कपटकारस्थान करून त्याचा खून केल्याची तक्र ार त्यांनी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी समीरची पत्नी समिधा आणि तिचा प्रियकर संतोष यादव संखे यांच्या विरोधात खून, कपटकारस्थान आणि पुरावा लपवून ठेवणे असे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. या प्रकरणी जलद सुनावणी घेण्याची मागणी आरोपी संतोष संखे ह्यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्या अन्वये जानेवारी २०१८ मध्ये पालघर मधील बहुचर्चित अशा ह्या खून प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात करण्यात आली. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर हे प्रकरण असल्याने पालघरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतल्या नंतर मृत समीर त्याची पत्नी समिधा ह्यांचे आरोपी संतोष आणि त्यांच्या कुटुंबिया सोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध, त्या नंतर संतोष व समिधा मध्ये झालेली जवळीक, त्या अनुषंगाने पतीपत्नींमधील वाढते मतभेद, घटस्फोटापर्यंत गेलेली मजल, २६ जून रोजी २०१५ रोजी दोघांनी मुंबई (बांद्रा) येथे चोरटया पध्दतीने केलेला विवाह, त्याची पालघर मधील एका महिलेकडे लपवून ठेवण्यात आलेली सर्व कागदपत्रे व फोटो, दोघांचे मोबाईल वरील संभाषण, टॉवर लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, असे सबळ पुरावे जमा करण्यात यश मिळविले. 

डोक्यावरून प्लॅस्टिकची पिशवी घालून केली मारहाण
मृत समीर याच्या डोक्यावर प्लास्टिक ची पिशवी घालून त्याला मारण्यात आल्याचे सत्य समोर आल्या नंतर ह्या प्रकरणातील हॅन्डग्लोव्हज, संतोष च्या नावाचे समिधा वापरत असलेले सीमकार्ड, प्लॅस्टिक पिशवी या पुराव्यातील वस्तू माहीम रोडवर एका निर्मनुष्य ठिकाणावर जाळण्यात आल्या होत्या. हे सर्व महत्वपूर्ण पुरावे पोलिसांनी जप्त करून एकूण ३४ जणांचे जाब जबाब नोंदविले होते व त्यांच्या साक्षी तपासल्या होत्या.

न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून पोलीस अधिकारी,सरकारी वकील अ‍ॅड. तरे यांनी आरोपीना शिक्षा व्हावी ह्यासाठी सबळ पुरावे सादर केल्याने न्यायालयाने आरोपीना दोषी ठरवले. दोघां आरोपीना न्यायालयाने कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. - हरेश्वर पिंपळे, समीरचे वडील

Web Title: Husband's blood, lover, girlfriend guilty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.