Despite the huge CCTV footage of the account holders of the ATMs, Bhamate Mokat | एटीएममधून खातेदारांना लाखोंचा गंडा, सीसीटीव्ही फुटेज असूनही भामटे मोकाट
एटीएममधून खातेदारांना लाखोंचा गंडा, सीसीटीव्ही फुटेज असूनही भामटे मोकाट

विरार : एटीएममधून रक्कम काढतांना मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचे दोन प्रकार येथे घडले आहेत. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या एटीएममध्ये हे प्रकार घडले असतांना अद्याप मुख्य प्रबंधकांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उलटपक्षी, ग्राहकांनी पोलिसात तक्रार करावी, ती कॉपी आम्हाला द्यावी, आम्ही लवकरच सुरक्षारक्षक तैनात करू, अशी उत्तरे ते देत आहेत.
गेल्या महिन्यात २५ जानेवारीला १ वाजून १५ मिनिटांनी नालासोपारा पूर्वेकडील स्टेट बँकेच्या एटीएममधून स्टेशन रोड येथे राहणारे सुनील गांजावाला यांनी १२ हजार रुपये काढले. स्क्रीन बरोबर दिसत नसल्याचे हेरून तेथे असणाºया टोळक्याने मदत करण्याच्या बहाण्याने कार्डांची अदलाबदल केली. त्यानंतर, वसईच्या जी.एम. ज्वेलर्समधून ५० हजारांचे सोने खरेदी केले. तसेच त्याने त्याच एटीएममधून २८ हजार रुपये काढले आणि ४० हजार अमितकुमार नावाच्या व्यक्तीच्या खात्यात वर्ग केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे नालासोपारा-आचोळे रोड येथील शंखेश्वरनगरमध्ये राहणारे बाळकृष्ण येवले हे २ फेब्रुवारीला नालासोपारा पूर्वेकडील याच एटीएममध्ये पैसे काढायला गेले. यावेळी मशीनच्या केबिनमध्ये आठ ते दहा लोक होते. त्यांनी आपले कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकले असता नंबर नीट दिसत नसल्याने त्यांच्यामागे असणाºया व्यक्तीने नंबर दाबण्यासाठी मदत केली. त्याने पुन:पुन्हा नंबर दाबले. येवले यांनी १८ हजार रुपये काढण्याची मशीनवर एण्ट्री केली. ते पैसे बाहेर येण्याची वाट पाहत असताना मागच्याने नकळत मशीनचे बटण दाबले. येवले यांनी अर्धा मिनिट वाट पाहिली, तरी पैसे आले नाही. त्याने या मशीनमध्ये पैसे नाहीत. तुम्ही बाहेर जाऊन दुसºया मशीनमधून पैसे काढण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून येवले बाहेर गेले असता, तो ठकसेन त्यांचे कार्ड टाकून आलेले पैसे घेऊन फरार झाला. येवले यांनी पुन्हा येऊन आत पाहिले असता भामटे पसार झाले होते.
नालासोपारा पूर्वेकडील स्टेट बँकेच्या एटीएममधून अशा रीतीने पैसे लांबविण्याचे प्रकार सर्रास घडत असतांनाही बँक प्रशासन कठोर कारवाईसाठी सुरक्षारक्षक का ठेवत नाही. असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. एटीएम मशीनच्या केबिनमधील सर्व हालचाली दृष्ये सीसीटीव्हीद्वारे दिसत असतांना असे प्रकार का रोखता येत नाही, असाही प्रश्न विचारला जातो आहे.

शक्य असल्यास गार्डची व्यवस्था करू. मात्र, ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढताना बाजूला कोणी असेल, तर त्याला बाहेर काढावे. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास बँकेशी संपर्क साधावा. अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये. ज्यांचे पैसे गेले आहेत, त्यांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून त्याची कॉपी बँकेला द्यावी.
- राजन सोनटक्के,
मुख्य प्रबंधक, स्टेट बँक, नालासोपारा


Web Title: Despite the huge CCTV footage of the account holders of the ATMs, Bhamate Mokat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.