Dahanu's development has been done by NCP !, BJP's allegations of corruption are unabated | डहाणूचा विकास राष्ट्रवादीनेच केला!, भाजपाचा भ्रष्टाचाराचा आरोप बिनबुडाचा
डहाणूचा विकास राष्ट्रवादीनेच केला!, भाजपाचा भ्रष्टाचाराचा आरोप बिनबुडाचा

डहाणू : पंचरंगी लढत असलेल्या डहाणू नगर परिषदेसाठीच्या प्रचारात राष्टÑवादी कॉँग्रेसकडून शहराचा विकास आम्हीच केल्याचा दावा करण्यात आल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिहीर शहा चर्चेमध्ये आले आहेत. त्यांनी आपण गत पाच वर्षामध्ये केलेल्या विकासाचा ग्राफच मांडून प्रमुख विरोधी पक्ष भाजपाला पेचात टाकले आहे. त्यामुळे भाजपाकडून काय भूमिका मांडली जाते हे सुद्धा उत्सुकता वाढवणारे ठरणार आहे.
शहरात नगर परिषद हददीत गेल्या पाच वर्षात नागरिकांसाठी सोयी-सुविधा, रस्ते, वीज, पाणी आदी मुलभूत सुविधांबरोबर विविध विकासकामे राष्ट्रवादीनेच केल्याने आज शहर सुशोभित दिसत आहे. विरोधकाकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते भ्रष्टाचाराचाचा बिनबुडाचा आरोप करीत असा टोला शहा यांनी लगावला. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षात सुजल निर्मल योजने अंतर्गत पाण्याची सोय केली आहे. सागर नाका येथील तारपा चौकाचे सुशोभिकरण, बालोद्यान, शहरात एलईडी दिवे बसवून डहाणू सुंदर केले, भुयारी गटार, रस्ते काँक्र ीटकरण, डांबरी करण, इत्यादी कामे राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेली असल्याचा ग्राफच त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये मांडला.
येथे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस, बविआ याच्यात पंचरंगी लढत असली तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच असल्याचे दिसू लागले आहे. या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीकडून विरोधकांना लक्ष करण्यापेक्षा केलेल्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहचवून मतांचा जोगवा मागण्याचे तंत्र अवलंबले आहे. आमदार आनंद ठाकुर, राजेश पारेख, करण ठाकुर, रमेश कर्नावट मतदारांशी संवाद साधून पक्षाची भूमिका व विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले आहे.

प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची हजेरी लागणार
जव्हार : निवडणूकीचा दिवस जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनिती आखून स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, धनंजय मुंडे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून अशोक चव्हाण, भाई जगताप, शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील तर भाजप कडून विनोद तावडे, विष्णू सावरा आणि चिंतामण वनगा यांच्या सभा निश्चित केल्या जाणार असल्याची माहिती पक्षीय प्रतिनिधींनी दिली आहे. पालघर जिल्हयातील जव्हार नगरपंचायतीची निवडणूक ही प्रतिष्ठेचे ठरत आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी कमी अवधी मिळाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवरच भर दिला आहे. हिवाळी अधिवेशन १० डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने, नेत्यांच्या सभांच्या तारखांची जुळवाजुळव सुरू केली आहे. दरम्यान, कमी कालावधी आणि हिवाळी अधिवेशनामुळे ८ ते १० डिसेंबरच्या दरम्यान, स्टार प्रचारकांच्या सभा होतील, असा अंदाज आहे. या सभांमुळे या निवडणुकांमधील वातावरण बदलणार असल्याचा विश्वास उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.