डहाणू : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी केलेल्या कारवाईमध्ये आशागड-धुंदलवाडी रस्त्यावरील घाडणे गावाजवळ एका व्हनमधून दमण बनावटीच्या मद्याच्या शंभर बॉक्सेसह दोन लाख सोळा हजार नऊशे साठ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये एकास अटक झाली आहे.
तालुक्यात दमण बनावटीच्या व गावठी दारूसह काळ्या गुळाने हैदोस घातल्याची बातमी लोकमतमधे प्रसिद्ध होताच झोपी गेलेले उत्पादनशुल्क विभाग जागा झाला आहे. त्यांनी सर्वत्र नाकाबंदी करून दमण मद्य पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, पालघर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार दिवसापूर्वी मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी नाका येथील एका हॉटेलच्या मागील बाजूच्या घरात बेकायदेशीररित्या एक लाख ब्याण्णव हजार सहाशे ऐंशी रुपयांचा दमण दारूचा अवैध साठा जप्त केला होता. (वार्ताहर)