The coastal shores .... the rush to see the seaside waves | हा सागरी किनारा.... समुद्रकिनारी लाटा पाहण्यासाठी उसळली गर्दी
हा सागरी किनारा.... समुद्रकिनारी लाटा पाहण्यासाठी उसळली गर्दी

डहाणू/बोर्डी - येथील समुद्र खळवलेला असून सुमारे साडेपाचफुट उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका किनार्‍यालगतच्या घरांना बसण्याची शक्यता आहे. उधाणलेल्या समुद्रातील लाटा पाहण्याकरिता येथील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी किनार्‍यावर गुरुवार, 12 जुलै रोजी नागरिकांनी गर्दी केली होती. पुढील दोन दिवस भरतीच्या लाटांची उंची साडेपाचमीटर पर्यंत असणार आहे. 

डहाणू बंदर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार 12 जुलै रोजी दुपारी दीडवाजता 5.37मीटर उंचीच्या, 13 जुलै रोजी दुपारी अडीचवाजता 5.62 मीटर उंचीच्या आणि 14 जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सर्वात अधिक 5.75 मीटर उंचीच्या लाटा असतील. किनारीभागात दिवसभर जोराचे वारे वाहत होते. गुरुवारच्या दुपारी लाटांनी उच्चतम भरतीरेषा ओलांडली. त्यामुळे किनार्‍यालगतच्या घरांमध्ये भरतीचे पाणी शिरण्याची तसेच लगतच्या सुरू बागातील झाडे उन्मळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारनाका येथील किनार्‍यावर बसविलेल्या धूप प्रतिबंधक काही जाळ्या बाहेर निघाल्या आहेत. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांसह लगतच्या शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे. तर पोलिसांनी गस्त वाढविण्यासह नगरपरिषद प्रशासनाने जीवरक्षकांना तैनात ठेवले पाहिजे. दरम्यान, याच पद्धतीने पर्यटन केंद्र असणार्‍या अन्य गावांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.


Web Title: The coastal shores .... the rush to see the seaside waves
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.