City STBnd students strike, Kundukuda cold stops | शहर एसटीबंदचा विद्यार्थ्यांना फटका, कुडकुडत्या थंडीत रखडपट्टी

वसई : एसटीने ५ डिसेंबरपासून शहरी वाहतूक बंद केल्याने सकाळी लवकर शाळा आणि महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. परिवहनची बस न आल्याने दीड तास थंडीत कुड़कुडत उभे राहिलेले विद्यार्थी कंटाळून घरी परतले. त्यामुळे विद्यार्थी एक दिवस शाळा-कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत.
वसई पश्चिम पट्टयातील हजारो विद्यार्थ्यांसाठी पहाटे सहा पासून एसटी महामंडळ शालेय बस सेवा देत असे. मात्र, या मार्गावर परिवहन सेवा बस सुरु करीत असल्याने वाहतूक बंद करीत असल्याचे पत्र एसटी महामंडळाच्या अधिकाºयांनी मंगळवारी प्रांताधिकाºयांना दिले. प्रत्यक्षात मात्र वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने बस सेवा दिली नाही.
निर्मळ, भुईगाव, गास, गिरीज आणि परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी सेंट अँथोनी कॉन्व्हेंट हायस्कूल कोळीवाडा, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वसई, सेंट थॉमस ज्युनियर कॉलेज पापडी आणि सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता एसटीची शालेय बस सेवा होती. पण, प्रांताधिकाºयांसमोर झालेल्या बैठकीत परिवहनच्या प्रतिनिधीने सकाळची शालेय बससेवा सुरु करू असे आश्वासन दिल्याने एसटीने बुधवारी सकाळपासून बससेवा बंद केली. मात्र, परिवहनने शालेय बस सेवा दिली नाही.
वसईतील २१ मार्गावरील एसटी बंद करण्याच्या महामंडळाच्या निर्णयावर जनहित याचिका अंतिम सुनावणी दरम्यान ७ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने २१ मार्गावरील प्रवाशांना व विद्यार्थ्यांना प्रवास करतांना कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता एसटी महामंडळ आणि महापालिका परिवहन सेवा या दोघांना संयुक्तपणे वाहतूक सेवा देणे बंधनकारक आहे असा आदेश दिला होता. त्यानंतर महामंडळाने २१ मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात महापालिका परिवहन सेवा देण्यास तयार आहे असे जाहिर करण्यात आले होते. परंतु, परिवहनच्या अपुºया सेवेचा फटका प्रवासी सहन करीत असताना आता विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे, असा आरोप जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्षा डॉमणिका डाबरे यांनी केला आहे. बुधवारी विद्यार्थ्यांचे झालेले शालेय नुकसान आणि मनस्तापाची जबाबदारी कोण घेणार असा सवाल जनआंदोलन समितीने विचारला आहे. एक दोन दिवस परिवहन आणि एसटीचा ताळमेळ बघू मग जनता, रस्त्यावर उतरतील. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला एसटी आणि महापालिका जबाबदार असेल, असा इशारा समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिला आहे.


Web Title: City STBnd students strike, Kundukuda cold stops
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.