चिंचणीत पारंपरिक दशावतारी नाटकांचा झाला बहारदार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:55 PM2019-05-12T23:55:02+5:302019-05-12T23:55:48+5:30

तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

 Chinchani played the traditional festival of Dashavatari | चिंचणीत पारंपरिक दशावतारी नाटकांचा झाला बहारदार महोत्सव

चिंचणीत पारंपरिक दशावतारी नाटकांचा झाला बहारदार महोत्सव

googlenewsNext

- अनिरु द्ध पाटील

बोर्डी : तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या गावातील सोनार आणि गुजराती कलावंतांनी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. मागील दीडशेहून अधिक वर्षांची वंशपरंपरागत बांधिलकीची धुरा आजची आधुनिक पिढी त्याच भावनेने जपतांना दिसते आहे. परंपरेने चालत आलेल्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षी १० ते १२ मे रोजी हा उत्सव साजरा करण्यात आला.
त्यानुसार विधिवत कलश पूजनानंतर देवी-देवतांना आवाहन करून ग्रामस्थांना आमंत्रीत करण्यात आले. त्याला पंचक्रोशीतील नागरिकांचीही उपस्थिती लाभली. शनिवारी रात्री ९ वाजता प्रारंभ होऊन गणपती आणि डाबदुब्या यांचा नाच झाला. त्यानंतर शंखासूर आणि भगवान विष्णू यांचा मत्स्यअवतार यातील द्वंद्व रंगले. त्यामध्ये विष्णूंचा विजय झाला. त्यानंतर बकसुराचा वध करण्यासाठी भीम अवतरले. तर त्राटिका राक्षसीणीच्या वधाकरिता हनुमंताने विजय प्राप्त केल्यानंतर पहिल्या रात्रीची सांगता झाली. दुसºया रात्री वाली आणि सुग्रीव यांचे नृत्य रंगले, त्यानंतर गजासुर दैत्याचा वध भगवान शंकराने स्वत: प्रकट होऊन केला. दक्ष प्रजापतीचा वध भगवान शंकराच्या वीरभद्र अवताराने केला. शिवाय मणी आणि मल्ला ह्या दोन दैत्यांच्या वधावेळी उपस्थितांची उत्सुकता ताणली गेली होती. पुन्हा एकदा शंकरांनी खंडोबांचा अवतार धारण करून त्यांचा खातमा केला. हिरण्यकशपूचा वध भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन केला. तर पहाटेच्या सुमारास महिषासुर आणि भवानी यांच्यात तुल्यबळ युद्धाचा थरार रंगला.
दरम्यान रविवारी पहाटे भवानी देवी महिषासुराचा वध करून समुद्रिमाता मंदिरात जाते. तिथे देवीची परंपरेनुसार पूजा पार पडल्यानंतर गावातील प्रत्येकाच्या घरी देवीची रूढी परंपरेनुसार ओटी भरून या दशाअवताराची सांगता झाली. या पारंपरिक खेळामुळे या गावाला पंचक्रोशीत विशेष ओळख प्राप्त झाली आहे. या गावच्या जाज्वल्य इतिहासाला अखंड परंपरा लाभावी म्हणून नवीन पिढी सक्रिय असल्याचे दिसून आले.

गावातील पिंपळनाका येथे या उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात भाग घेणारे कलाकार वंशपरंपरागत त्याच ठरलेल्या कुटुंबातील आहेत. वडील आणि आजोबा-पणजोबांचा वारसा ही आधुनिकपिढी त्याच जबाबदारीतून सांभाळते आहे. त्यापैकी काही कलाकार नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईला स्थायिक झाले असले तरी दरवर्षी उत्सव काळात ते आपले योगदान देत आहेत.
दरम्यान कोणता कलाकार कोणते पात्र वठवतोय त्याचे गुपीत आजही उलगडलेले नाही. हे येथील विशेष आहे. कारण तसे झाल्यास कुतूहल संपेल शिवाय सामाजिक जीवनात त्या पात्रावरून कलाकाराला कोणत्याही प्रकारचे बोल ऐकायला लागू नये हा उदात्तभाव स्थानिकांनी बोलून दाखवला.

Web Title:  Chinchani played the traditional festival of Dashavatari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.