हापसा न मारता २४ तास पाणी येणाऱ्या बोअरवेलचे पाणी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:32 PM2019-05-24T23:32:56+5:302019-05-24T23:33:01+5:30

शिरोळ भागातील प्रकार : या भागातील पाणीटंचाई कायमच

The borewell water which comes in 24 hours water without the help of hapasa is less | हापसा न मारता २४ तास पाणी येणाऱ्या बोअरवेलचे पाणी कमी

हापसा न मारता २४ तास पाणी येणाऱ्या बोअरवेलचे पाणी कमी

Next

वसंत पानसरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हवली : काही महिन्यांपूर्वी शिरोळ भागात साई पालखी संस्थानने मारलेल्या बोअरवेलला हापसा न मारता २४ तास पाणी येत होते. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा होती. आता तालुक्यातील पाणीटंचाई एवढी तीव्र झाली असताना पुन्हा या बोअरवेलला भेट दिली असता तेथील पाणी कमी झाले असून हाताने हापसा मारूनही पाणी कमी प्रमाणात येत आहे.


तालुक्यातील खर्डी विभागात पाणीटंचाई नेहमीच तीव्र असल्याने शिरोळ ग्रामपंचायत हद्दीत करंजपाडा गावात मुंबई-नाशिक महामार्गालगत साई पालखी संस्थेने मारलेल्या बोअरवेलला २४ तास पाणी लागल्याने येथील नागरिकांना आशेचा किरण वाटत होता. मात्र, काही महिन्यांमध्येच या बोअरवेलचे पाणी अगदी कमी झाले असून हाताने हापसा मारूनही पाणी कमी येत आहे.


ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण असून तालुक्यातील दोनशेहून अधिक गावपाड्यांत शासनाच्या २५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाढते तापमान तसेच पाण्याची खोल गेलेली पातळी यामुळे या भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत.

दिगडीचापाडा पाण्यापासून कोसो दूर
जर्नादन भेरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भागतसानगर : तालुक्यातील गावपाड्यांत मोठी पाणीटंचाई असून त्यात सातत्याने वाढ होते आहे. यामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न अधिकाधिक गंभीर रूप धारण करत आहे.
तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गाला लागून असलेला पाडा म्हणजे दिगडीचापाडा. या पाड्यावर १०० च्या आसपास लोकसंख्या आहे. येथे अनेक वर्षांपासून लोक राहत असूनही त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर नाही किंवा पाण्यासाठी कोणतीही योजना नाही. ज्या कलमगाव ग्रामपंचायतीत हा पाडा येतो, त्याच गावपाड्यांतील नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे.
हा पाडा पाणीयोजनेपासून कोसो दूर. त्यामुळे या पाड्यात पाणी देणे शक्यही होणार नाही. या परिसरात विहिरीला पाणीच लागत नाही. पाडा जरी महामार्गाला लागून असला, तरी तो पाणीस्रोतांपासून खूप लांब आहे. त्यामुळे पाड्यात पाणी नाही, मात्र टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य आहे. या पाड्यातील महिला एक किमी अंतरावरील ओहळावर पाणी भरण्यासाठी जात आहेत. तालुक्यात आज अनेक पाडे पाण्यासाठी वणवण भटकत असले, तरी असेही काही गावपाडे जे महामार्गाला लागून आहेत, त्यांना पाणी नाही. पाणी घेऊन येताना या महिलांना रस्ता क्रॉस करावा लागतो. वाहनांपासून बचाव करतच त्यांना यावे लागते. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठयाची मागणी महिलांनी केली आहे. येत्या काही दिवसांत ही पाणीटंचाई अधिक तीव्रता निर्माण करेल, अशीच चिन्हे दिसत आहेत.

Web Title: The borewell water which comes in 24 hours water without the help of hapasa is less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.