डहाणू-तलासरीत मोठा भूकंप अशक्यच! भूकंपतज्ञ व्ही. के. गहलोत यांचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:22 AM2019-02-06T02:22:19+5:302019-02-06T02:24:32+5:30

भूकंपतज्ज्ञानी शनिवारी डहाणू व तलासरीतील भूकंप प्रवण क्षेत्राची पाहणी करुन मोठ्या भूकंपाची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

big earthquake impossible in Dahanu-Talasure! - V. K. Gehlot | डहाणू-तलासरीत मोठा भूकंप अशक्यच! भूकंपतज्ञ व्ही. के. गहलोत यांचा निर्वाळा

डहाणू-तलासरीत मोठा भूकंप अशक्यच! भूकंपतज्ञ व्ही. के. गहलोत यांचा निर्वाळा

Next

डहाणू  - भूकंपतज्ज्ञानी शनिवारी डहाणू व तलासरीतील भूकंप प्रवण क्षेत्राची पाहणी करुन मोठ्या भूकंपाची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. आतापर्यंत मोजण्यात आलेले भूकंपाचे धक्के कमी क्षमतेचे असून मोठा भूकंप होईल, ही भिती अनाठाई असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मोठ्या भूकंपाची तीव्रता ६ ते ६.५ रिश्टर स्केल इतकी असते. तसेच, मोठा भूकंप जेव्हा होतो तेव्हा कंपनाची लांबी सर्वाधिक असते. तेवढी लांबी येथे होत असलेल्या भूकंपाची नसल्याचे भूकंपतज्ञ व्ही. के. गहलोत म्हणाले.

तलासरी तालुक्यातील सुमारे १० ते १२ गावामध्ये गेल्या ३ महिन्यापासून सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सतत भीतीच्या सावटाखाली राहावे लागत असल्यामुळे ग्रामस्थ आता अन्यत्र स्थलांतर करण्याच्या मनिस्थतीत आहेत. अशा भीतीदायक वातावरणात राष्ट्रीय आपत्कालीन विभागाचे कर्मचाऱ्यांनी येथील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा उभी करण्यास आरंभ केला आहे. भूकंप झाल्यास आपण बचाव कसे करणार या विषयावर एनडीआरएफच्या पुणे येथील पथकाच्या कमांडर ए. के. जैन यांनी शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या भागात भूकंपमापन यंत्रे वाढवली आहेत. विविध गावांत ४२ ठिकाणी २०० पेक्षा जास्त निवासी तंबू उभारण्यात आले आहेत. प्रशासन यंत्रणांनी या परिसरातील रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी कंबर कसली असून भूकंप झाल्यास काय करावे ? काय करू नये ? या सूचना खेड्यापाड्यातील जनतेला सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावांत ग्रामसभेत याविषयी माहिती देणे, सर्व शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा प्रकल्प कर्मचारी महिलांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेणे, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, महसूल विभागाचे सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन भूकंपा बाबत आपापल्या क्षेत्रात जनजागृती करण्याचे ठरले आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका : नारनवरे

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यांनी स्वत: या भागातील भूकंप प्रवणक्षेत्रातील गावपाड्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. ग्रामस्थांना मानसिक धीर देत त्यांनी आपत्कालीन यंत्रणांचा आढावा घेऊन ग्राउंड रिपोर्टवर विशेष भर दिला आहे. त्यामुळे जनतेचे मनोधैर्य उंचावण्यास बळ मिळण्याची शक्यता आहे.
धुंदलवाडी व डहाणमध्ये याबाबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञांनी या भूकंप हादºयांची तीव्रता कमी असल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये असे आवाहन केले आहे. वलसाड, जव्हार, सौराष्ट्र भागात अशा भूकंपाची नोंद झाली आहे.

भूकंपप्रवण क्षेत्र प्रशासन मदतीसाठी तत्पर
पालघर : जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आदी भूकंप प्रवण भागातील नागरिकांनी भूकंपामुळे घाबरु न जावू नये. प्रशासन आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असून आपत्कालीन स्थितीत प्रशासनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी येथे केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी आयोजित पालघर जिल्ह्यातील भूकंपा संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, नागरी संरक्षण दलाचे महानिदेशक संजय पांडे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, आयआयटी, मुंबई येथील तज्ज्ञ डॉ. रवी सिन्हा, राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान हैद्राबादचे अधिकारी डी. श्रीनागेश, राज्य आपत्ती निवारण कक्षाचे संचालक दौलत देसाई आदी उपस्थित होते. ते म्हणाले, शासनाने भूकंपसंदर्भात गंभीर दखल घेतली असून सावधानतेबाबत काळजी घेण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. भूकंपासंदर्भातील विविध तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून सावधानतेबाबत काय दक्षता घ्यावी याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार शासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जातील. भूकंपग्रस्त भागात जनजागृती करु न लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकाºयांनी दिल्या सूचना

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रशासनाच्यावतीने केलेल्या व करण्यात येणाºया विविध उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने जनजागृती शिबिरे, प्रसारमाध्यमांद्वारे जागृती, तात्पुरती निवास व्यवस्था, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, सतर्कतेच्या सूचना, महावितरण, पोलीस, नागरी सुरक्षा दल, राष्ट्रीय आपती निवारण दल आदी विभागांनी करावयाची कामे तसेच पालघर जिल्ह्यातील मोठे प्रकल्प यांनी घ्यावयाची काळजी बाबत माहिती दिली.

वकील व पक्षकारांसाठी भूकंप जनजागृती परिसंवाद

डहाणू : गेल्या तीन महिन्यापासून डहाणू तलासरी भागात सतत भूकंपाचे धक्के बसत असून, शुक्र वारी ४.१ रिश्टर स्केलचा धक्का थेट डहाणूपर्यंत जाणवला. त्यांत डहाणू न्यायालयाची इमारत आणि न्यायाधीश निवासस्थान देखील हादरले. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून, डहाणू दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी जे. आर. मुलाणी यांनी भूकंप झाल्यास कोणती दक्षताघ्यावी आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी वकील व पक्षकारांसाठी भूकंप जागृती परिसंवादाचे आयोजन केले होते.
या परिसंवादासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असलेले, संशोधक व भूकंपरोधक बांधकातंत्रज्ञ, महेश यशराज यांना व्याख्याते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यशराज याच्या म्हणण्या नुसार भुगर्भात शंभर किलोमीटर पर्यंत जमीन आणि समुद्र येतो. त्यानंतर पुढे १३ हजार डिग्री तापमानाचा लाव्हारस असतो. तो पृथ्वीच्या कवचातुन बाहेर येण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी भुगर्भात एकमेकीशी जोडल्या गेलेल्या सातही प्लेटी हलतात आणि भूकंप होता. पृथ्वीच्या परिवलनाची गती ०.५ मायक्रो सेकंदाने कमी झाल्याने, भूकंपाच्या घटना सतत घडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डहाणूत भूकंप झाला त्यावेळेस जम्मूतही तो झाला, म्हणजे निद्रिस्त भूकंप कुठेही होऊ शकतो. जानेवारी महिन्यात १.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे ३८ हजार भूकंपाचे धक्के बसले असल्याचेही त्यांनी सांगितले.
भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती येणार असल्याची जाणीव, पाळीव प्राण्यांची घाणेद्रिये क्षमता प्रचंड असल्याने त्यांना सर्वप्रथम त्यांची स्पंदने जाणवतात. त्यासाठी प्राण्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. भूकंपाची जाणीव झाल्यास विजेच्या खांबाखाली किंवा झाडाखाली न जाता ,मोकळ्या जागेवर उभे रहा, घरांत अडकून पडण्याची वेळ आली तर, पलंगाखाली किंवा टेबलाखाली आश्रय घ्यावा, मौल्यवान कागदपत्राचे आधीच फोटोकॉपिज करून सरक्षित ठेवून द्याव्यात, घरातील वीज, फ्रीज ,गॅस , आणि स्विच बंद करावा आदी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

Web Title: big earthquake impossible in Dahanu-Talasure! - V. K. Gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.