वसई : कामण येथील शिवसेनेच्या विभागप्रमुखाची गेली २५ वर्ष सुरु असलेली न्यायालयीन लढाई यशस्वी ठरली असून, याप्रकरणी तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीसह सहा जणांना एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा वसईच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुनावली आहे.
२७ जून १९९१ ला रात्री ८.१५ च्या दरम्यान परागदिन जयस्वाल,राधेशाम जयस्वाल,घनशाम जयस्वाल या तिघांनी जमीनीच्या वादातून आपल्या घरावर ५०-६० जणांच्या जमावासह सशस्त्र हल्ला केला. त्यांनी घराला घेरले, महिलांना अश्लिल शिवीगाळ केली आणि घर जाळून टाकण्याची धमकी दिली.अशी तक्रार लक्ष्मण उर्फ आप्पा विरारकर यांनी वसई पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यामुळे आप्पा विरारकर यांनी वसई न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
या फिर्यादीवर सुनावणी होवून तब्बल २५ वर्षे ६ महिने आणि ६ दिवसांनी निकाल लागला आहे. आरोपींच्या वतीने नेत्रा नाईक यांनी तर सरकार पक्षातर्फे संजय समेळ यांनी केलेला युक्तीवाद विचारात घेवून आरोपींनी फिर्यादीला भीती दाखवण्याच्या हेतूने त्याच्या मालमत्तेला क्षती पोहोचवण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी गुन्हा केला आहे. तसेच त्यांनी याच उद्देशाने बेकायदा जमाव जमवला आणि प्राणघातक हत्यारासह ते सज्ज होते. त्यामुळे त्यांनी आणखी एक गुन्हा केला आहे,असा निष्कर्ष न्यायालयाने काढून हा आदेश दिला.
आरोपी राधेशाम जयस्वाल, घनशाम जयस्वाल,अजय मदने,प्रभाकर दामोदर म्हात्रे, सुरेश म्हात्रे,प्रकाश म्हात्रे यांना या प्रकरणी दोषी ठरविले असून, प्रत्येकी एक महिना सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोेन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
हा महत्वपूर्ण निकाल वसईचे न्याय दंडाधिकारी मा.ये.वाघ यांनी दिला आहे. तसेच आरोपींकडून दंडाची रक्कम वसूल झाल्यावर त्यातील ९ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून फिर्यादीला देण्यात यावे.
आरोपींचे जामीनपत्र समर्पित करावे. हा आदेश ठाण्याच्या तुरुंगाधिकाऱ्यांना कळवण्यात यावा, असा निकालही न्यायालयाने यावेळी दिला. (प्रतिनिधी)


शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रभाकर म्हात्रे हे तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आहेत. तसेच कामण गावचे माजी सरपंच देखिल आहेत. पूर्वी जनता दलात विविध पदांवर कार्यरत असलेले म्हात्रे सध्या बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत. तर फिर्यादी आप्पा विरारकर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आहेत.त्यामुळे राजकिय दृष्टीकोनातूनही या प्रकरणाकडे पाहिले जात होते.न्याय प्रक्रियेवर माझा संपूर्ण विश्वास आहे.त्यामुळेच २५ वर्षे दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी झाला. अशी प्रतिक्रिया विरारकर यांनी दिली. या प्रकरणी प्रभाकर म्हात्रे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.