ठळक मुद्देराष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक निर्मितीचे काम लवकरच सुरू होत आहे. या कामासाठी ७ कोटी ७ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले असून यातून बसस्थानकाचा चेहरा बदलणार आहे.
या निधीतून संपूर्ण परिसराचे मजबूतीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण, आधुनिक पीव्हीसी फॉल सिलिंग, शुद्ध वातावरणासाठी बगिच्याची सुविधा, वेटींग हॉलच्या आधुनिकीकरण, ग्रामीण विभागासाठी नऊ फलाट फार्म, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भरपूर क्षमता असलेले दोन सेफ्टीक टँक, दर्शनी भागात आकर्षक वॉल कंपाऊंड, डिजीटल एल. ई. डी. डिस्प्ले, मजबूत व आकर्षक फ्लोरींग, टूव्हिलर पार्किंगसाठी विशेष व्यवस्था, बगीचामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा, प्रवाशाच्या सुविधेकरिता विविध दुकानांची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थाकरिता स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था, स्टाफकरिता आरामदायी गेस्ट रूम, महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह, कँटींगचे आधुनिक पद्धतीने नुतनीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. उल्लेखनिय म्हणजे जुनी विभाग नियंत्रक कार्यालयाची इमारत पाडून तेथे ग्रामीण करीता बस स्थानक तयार करण्यात येणार आहे. एकूणच वर्धा बसस्थानकाचा चेहरा बदलणार आहे.