वर्ध्यात पाणीबाणी; उसनवारीवर भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:43 PM2019-03-28T22:43:20+5:302019-03-28T22:43:42+5:30

शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे.

Waterfall; Thirsty | वर्ध्यात पाणीबाणी; उसनवारीवर भागवितात तहान

वर्ध्यात पाणीबाणी; उसनवारीवर भागवितात तहान

Next
ठळक मुद्देआता हातपंपच ठरताहेत आधार : पाच दिवसांआड पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे. अशा प्रकारे पाण्याच्या उसणवारीवर वर्धेकर सध्या तहान भागविताना दिसून येत आहेत.
मार्च महिना उलटताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहे. वर्धा शहरासह लगतच्या तेरा गावांना धामनदीतून येळाकेळी आणि पवनार या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. अर्ध्या शहराला पवनार तर अर्ध्या शहराला येळाकेळी येथून नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा होतो. तसेच लगतच्या तेरा गावांना येळाकेळी येथूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा होतो. सर्वाधिक पाण्याची उचल ही येळाकेळी येथूनच केली जाते. अल्प पर्जन्यमानामुळे धामनदीपात्रातच ठणठणाट असल्याने पाटबंधारे विभागाद्वारे महिन्यातून एकदाच पाणी सोडले जात आहे. ते पाणी पवनार व येळाकेळीपर्यंत पोहोचण्याकरिता एक दिवसाचा कालावधी लागतो. हे पाणी शहरासह तेरा गावांना महिनाभर पुरवायचे असल्यामुळे शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.
लगतच्या गावांमध्ये तर पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. सध्या पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अशा स्थितीत शहरासह लगतच्या गावातही पाणीबाणी निर्माण झाली असून ही तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दिवसात पाण्याअभावी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरू असून सध्या हातपंपाचा आधार मिळत आहे. परंतु, दिवसभर हातपंपावर घालविणे शक्यता नसल्याने शहरासह लगतच्या गावातील नागरिकांनी आता पाण्याकरिता ‘एकमेका सहाय्य करू’ अशी भूमिका घेतली आहे.

अशी चालतेय देवाण-घेवाण
वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, मसाळा, वरुड, सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), वायगाव, दत्तपूर व सालोड (हि.) या गावांना जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी पुरवठा होतो; तर वर्धा शहरात नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वर्धा शहरालगत प्रामुख्याने पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, सिंदी (मेघे) ही गावे आहेत. त्यामुळे सीमेवरील काही नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठविण्याचे साहित्य सीमेच्या अल्याडपल्याड नेऊन ठेवले आहे. शहरीभागातील नळ आले की, ग्रामीण भागातील नागरिक पाणी नेतात तसेच ग्रामीण भागातील नळ आले तर शहरी भागातील नागरिक पाणी घेतात. अशा प्रकारे पाण्याची देवाण-घेवाण करून तहान भागविण्याचा खटाटोप सुरू आहे.

नागरिकांच्या खिशालाही झळा
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाई सुरू झाल्याने बहुतांश नागरिकांनी नळयोजनेवर अवलंबून न राहता भूगर्भ पोखरून बोअरवेल करण्यावर भर दिला. तसेच काहींना पाण्याची साठवणूक करण्याकरिता प्लास्टिकचे ड्रम किंवा इतर भांडी घेण्यासाठी खिसा खाली करावा लागला. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात सध्या अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पिण्याकरिता मिनरल वॉटरचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पाण्याकरिता नागरिकांच्या खिशालाही झळ सोसावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Waterfall; Thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.