Wardha Blast : पोटाची आग शमविण्यासाठी डोक्यावर जिवंत बॉम्ब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:53 PM2018-11-20T22:53:11+5:302018-11-20T22:54:04+5:30

पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.

Wardha Blast: Live Bomb carrying on the head to extinguish the fire of stomach! | Wardha Blast : पोटाची आग शमविण्यासाठी डोक्यावर जिवंत बॉम्ब !

Wardha Blast : पोटाची आग शमविण्यासाठी डोक्यावर जिवंत बॉम्ब !

Next
ठळक मुद्देकंत्राटदार मिळवतो रोज ५ लाख, मजुरांच्या हातात २०० रुपये

नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात रोजगाराची वाणवा आहे. त्यामुळे येथील तरुण मिळेल ते काम करतात. तालुक्यातील पुलगावचे केंद्रीय दारुगोळा भंडार केवळ भारतात नव्हे तर आशिया खंडात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशाच्या सैन्यदलासाठी वापरण्यात येणारा दारुगोळा संग्रहित केला जातो. कालबाह्य दारुगोळा नष्ट करण्याचेही काम या परिसरात होते. पूर्वी लष्कराचे अधिकारी प्रशिक्षित अधिकारी आणि तंत्रज्ञांच्या देखरेखीत दारुगोळा नष्ट करण्याचे काम करायचे. खासगीकरण आणि त्याला चिकटलेली भ्रष्टाचाराची कीड या महत्त्वपूर्ण आणि धोकादायक कामापर्यंतही पोहचली. पुलगावच्या चांडक बंधूने राजकीय वजन वापरून त्यांनी हे कंत्राट मिळवले अन् गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दारुगोळा नष्ट करण्याचे काम सुरू केले. बॉम्ब नष्ट करण्यासाठी स्फोट घडविल्यानंतर सुमारे दोन क्विंटल लोखंड (तुकडे) आणि इतर धातूचे तुकडे असे सुमारे ५ ते ६ लाखांचे साहित्य त्यातून बाहेर पडतात. यातील १५ ते २० टक्के धातू मजुरांकडून उचलून नेली जाते. त्या बदल्यात प्रत्येक मजुराला २०० ते ३०० रुपये मिळतात. तर, उर्वरित धातू कंत्राटदार चांडक बंधूच्या घशात जाते. त्यातून त्याला ४ ते ५ लाख रुपये मिळतात. कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही, अशी माहिती आतमध्ये काम करणाऱ्यांपैकी काहींनी घटनास्थळी लोकमतला सांगितली. दरम्यान, ही घटना घडल्यापासून चांडक बंधू ‘आऊट आॅफ कव्हरेज एरिया’ आहे.

भावनाशून्य व्यवहार !
या भीषण घटनेत जीव गमविलेल्या आणि गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. दुसरीकडे चांडक बंधूने स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी धावपळ चालविली आहे. या गुन्ह्यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये तसेच याला अपघाताचे रूप देऊन आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये म्हणून, राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरुआहेत.

Web Title: Wardha Blast: Live Bomb carrying on the head to extinguish the fire of stomach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.